कोल्हापुरात तरुणीवर १० महिने सामूहिक अत्याचार; मुरगूड पोलिसांकडून ४ नराधमांना बेड्या

राज्यभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच, आता कोल्हापूर जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या राधानगरी परिसरात एका महाविद्यालयीन तरुणीवर तब्बल १० महिने चौघांनी मिळून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन हा नराधम प्रकार सुरू होता. याप्रकरणी मुरगूड पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली असून संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

फोटोग्राफर प्रियकरानेच केला घात!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी आदित्य शेटके याचा राधानगरीमध्ये फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. याच व्यवसाया दरम्यान त्याची ओळख पीडित तरुणीशी झाली होती. ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमसंबंधांमध्ये झाले. मात्र, प्रेमाचे नाटक करत आदित्याने पीडित तरुणीसोबत शारीरिक जवळीक साधली आणि तिचे काही अश्लील व्हिडिओ व फोटो मोबाईलमध्ये चित्रित केले. हेच फोटो आणि व्हिडिओ पुढे तरुणीसाठी नरकयातना ठरले.

मित्रांना बोलावून १० महिने अत्याचार

आदित्यने केवळ स्वतःच अत्याचार केला नाही, तर ते अश्लील व्हिडिओ दाखवून पीडितेवर दबाव टाकला आणि तिला आपल्या इतर मित्रांशी बोलण्यास भाग पाडले. गेल्या १० महिन्यांपासून हे चारही आरोपी पीडित तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बळजबरी करत होते. “जर आमचे ऐकले नाही, तर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करू,” अशी धमकी नराधम तिला सातत्याने देत होते. अखेर हा त्रास सहन न झाल्याने पीडितेने पोलिसात धाव घेतली.

‘या’ चार नराधमांना पोलीस कोठडी

तरुणीच्या तक्रारीनंतर मुरगूड पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत राधानगरी परिसरातील चारही तरुणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आदित्य शेटके (मुख्य आरोपी/प्रियकर),पवनगिरी पालकर,विक्रम पाटील, रणजीत मुधोळकर अशी आहेत

पोलिसांनी या चारही संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने आणखी काही मुलींना अशा प्रकारे जाळ्यात ओढले आहे का? याचा तपास आता मुरगूड पोलीस करत असून, या तपासातून कोणती नवीन माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.