
प्रेमसंबंधांमध्ये अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना लिंबागणेश परिसरात उघडकीस आली आहे. हत्येनंतर हा रस्ते अपघात असल्याचा बनाव रचण्यात आला होता, मात्र पोलिसांनी अवघ्या ५ दिवसांत या थरारक हत्याकांडाचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी आरोपी पत्नी, तिचा प्रियकर आणि एका साथीदाराला पनवेलमधून बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

काही दिवसांपूर्वी किरण सोनवणे यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. त्यांच्या अंगावर दुचाकी पडलेली असल्यामुळे प्रथमदर्शनी हा एक सामान्य रस्ते अपघात असावा, असंच चित्र निर्माण करण्यात आलं होतं.मृतदेहाची स्थिती पाहून नेकनूर पोलिसांना संशय आला. त्यांनी तातडीने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवाल समोर येताच पोलिसांचे कान टवटवले; कारण किरण यांचा मृत्यू अपघातामुळे नाही, तर गळा आवळल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले होते. यानंतर पोलिसांनी तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल केला.
प्रेमसंबंध आणि पतीचा जाच
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मृताची पत्नी प्रियंका सोनवणे हिच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली. प्रियंकाचे दशरथ परदेशी नावाच्या तरुणासोबत सूत जुळले होते. पती किरण हा आपल्या दोघांच्या प्रेमात अडसर ठरत असून तो आपल्याला जाच देत आहे, असा प्रियंकाचा समज होता.याच रागातून प्रियंकाने प्रियकर दशरथ आणि त्याचा मित्र धीरज येडे यांच्यासोबत मिळून पतीच्या हत्येचा कट रचला.
तो एक ‘कोडवर्ड’ अन् आरोपी जेरबंद!
घटनेच्या रात्री आरोपींनी किरण यांचा गळा आवळून क्रूरपणे खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी मृतदेह रस्त्याच्या कडेला दुचाकीखाली दाबून टाकला, जेणेकरून तो अपघात वाटेल.
‘कार्यक्रम ओके’…
हत्या यशस्वी झाल्यानंतर आरोपींनी एकमेकांना फोन केला आणि ‘कार्यक्रम ओके’ असा कोडवर्ड वापरून काम फत्ते झाल्याचा निरोप दिला. पण, हाच तांत्रिक पुरावा आणि कॉल रेकॉर्ड पोलिसांच्या हाती लागला आणि आरोपींचे बिंग फुटले.
पनवेलमधून आवळल्या मुसक्या
गुन्हा केल्यानंतर तिन्ही आरोपी फरार होऊन थेट पनवेल येथे जाऊन लपले होते. मात्र, नेकनूर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचे अचूक लोकेशन शोधून काढले. पनवेलमध्ये सापळा रचून पोलिसांनी प्रियंका सोनवणे (पत्नी),दशरथ परदेशी (प्रियकर), धीरज येडे (प्रियकराचा मित्र) या तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे पाच दिवसांत एका अंधाऱ्या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला आहे.










