सोन्याची अंगठी असलेला धोंडा मांजराने खाल्ला! बीडमधील ‘या’ विचित्र घटनेची राज्यभरात

अधिकमासात जावयाला ‘धोंडा’ म्हणून सोन्याची अंगठी देण्याचा सासरच्यांचा बेत एका मांजरामुळे चांगलाच अंगलट आला आहे. जावयासाठी खास तयार केलेला आणि सोन्याची अंगठी दडवलेला धोंडा चक्क एका मांजराने फस्त केल्याची धक्कादायक आणि तितकीच विचित्र घटना बीडमधून समोर आली आहे. यानंतर अंगठी बाहेर काढण्याच्या नादात त्या निष्पाप मांजराचा जीव गेला असून, बीड जिल्ह्यात सध्या या प्रकरणाचीच जोरदार चर्चा सुरू आहे.

जावयाला ‘सरप्राईज’ देण्याच्या नादात गडबड!

सध्या पवित्र अधिकमास (धोंड्याचा महिना) सुरू असल्याने जावयाचे सासरच्या घरी मोठे लाड पुरवले जात आहेत. बीडमधील एका कुटुंबानेही आपल्या लाडक्या जावयाला खास सरप्राईज देण्याचे ठरवले होते. सासर्‍यांनी जावयासाठी सोन्याची महागडी अंगठी आणली होती. ही अंगठी त्यांनी थेट एका धोंड्याच्या (खाद्यपदार्थ) आत लपवून ठेवली आणि तो धोंडा इतर धोंड्यांमध्ये एकत्र करून ठेवला. जावबा जेवायला बसल्यावर त्यांना हे सरप्राईज द्यायचे, अशी घरच्यांची योजना होती.

…अन् घरात आलेल्या मांजराने ‘तोच’ धोंडा फस्त केला!

सगळा स्वयंपाक आटोपल्यानंतर घरात आवराआवरी सुरू होती. अशातच घरच्यांचे डोळे चुकवून एक मांजर घरात शिरली. संपूर्ण ताटात ठेवलेल्या धोंड्यांमधून त्या मांजराने नेमका सोन्याची अंगठी असलेलाच धोंडा तोंडात धरला आणि क्षणार्धात फस्त केला! हे पाहताच सासरच्या मंडळींची चांगलीच धांदल उडाली. जावयाचे सोने मांजराच्या पोटात गेल्याने घरात एकच खळबळ उडाली.

४ दिवस मांजराला केलं नजरकैदेत, पुढे जे घडलं ते धक्कादायक…

सोन्याची अंगठी परत मिळवण्यासाठी घरच्यांनी मांजराला चक्क चार दिवस घरात दोरीने बांधून ठेवले. मांजराच्या विष्ठेद्वारे (शी तून) अंगठी बाहेर पडेल, अशी घरच्यांना अपेक्षा होती. मात्र, चार दिवस उलटूनही अंगठी बाहेर आली नाही.

अखेर हताश झालेल्या कुटुंबियांनी मांजराला पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी मांजराच्या पोटातून अंगठी बाहेर यावी म्हणून तिला उलटी होण्याचे औषध दिले. मात्र, औषध दिल्यानंतर मांजराला उलटी तर झालीच नाही, उलट औषधाच्या रिॲक्शनमुळे त्या निष्पाप मांजराचा जागीच जीव गेला.

अखेर मांजराचे ‘पोस्ट-मॉर्टम’ करून काढली अंगठी!

मांजराचा मृत्यू झाल्यानंतरही सोन्याचा मोह सुटला नाही. अखेर मृत मांजराच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्याच्या पोटातून ती सोन्याची अंगठी सुखरूप बाहेर काढण्यात आली.

जावयाला अहेरावरच मानावे लागले समाधान

सोन्याची अंगठी हातात आली खरी, पण घरात घडलेल्या या विचित्र नाट्यमय घडामोडींमुळे आणि मांजराच्या मृत्यूमुळे सासरच्या घरातील आनंदाचे वातावरण काहीसे विरघळले. अखेर सासरच्यांनी जावयाला फक्त कपड्यांचा आहेर केला आणि जावबांनाही त्याच अहेरावर समाधान मानावे लागले. सध्या बीडमधील या ‘गोल्डन मांजराची’ आणि जावयाच्या अजब धोंड्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.