‘मुलगी का झाली?’ सासरच्यांच्या छळाला कंटाळून २२ वर्षीय नवविवाहितेची आत्महत्या

समाजात आजही मुलीच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा केला जात असताना, दुसरीकडे ‘मुलगी का झाली?’ यावरून सासरच्या जाचाला कंटाळून एका २२ वर्षीय नवविवाहितेने आपलं जीवन संपवल्याची मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात हा प्रकार घडला आहे. हुंडा, दागिने आणि मुलीचा जन्म यावरून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून या तरुणीने राहत्या घरात गळफास घेतला. मयुरी सचिन खरे (वय २२, रा. भोकनगाव, ता. कन्नड) असं आत्महत्या केलेल्या दुर्दैवी नवविवाहितेचं नाव आहे.

घरात कोणी नसताना उचलले टोकाचे पाऊल

मिळालेल्या माहितीनुसार, भोकनगाव येथील मयुरीच्या घरात जेव्हा कोणीही नव्हते, त्या वेळेचा फायदा घेऊन तिने छताच्या लोखंडी हुकाला ओढणीने गळफास लावला. काही वेळानंतर घरातल्या लोकांच्या हा प्रकार लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली. मयुरीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र दुर्दैवाने डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.

सुरुवातीला लाड, नंतर छळ!

मयुरीचे लग्न झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस सासरी सगळं काही सुरळीत सुरू होतं. मात्र, काही महिने उलटताच सासरच्या मंडळींनी तिचे खरे रूप दाखवण्यास सुरुवात केली. माहेरून हुंडा आणि दागिन्यांसाठी तिच्याकडे वारंवार पैशांची मागणी केली जात होती. त्यासाठी तिचा सतत मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता.

‘मुलगी झाली’ अन् जाच वाढला…

दरम्यानच्या काळात मयुरी गरोदर राहिली आणि तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, सासरच्या लोकांना वंशाचा दिवा हवा होता. मुलगा का झाला नाही आणि ‘तुला मुलगी का झाली?’ यावरून सासरच्यांनी मयुरीचा छळ आणखी तीव्र केला. रोजचा हा जाच सहन करण्यापलीकडे गेल्याने, अखेर मयुरीने आपल्या चिमुरड्या लेकीला मागे सोडून जगाचा निरोप घेण्याचं टोकाचं पाऊल उचललं.

सासरच्यांवर गुन्हा दाखल

या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच कन्नड ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी मयुरीच्या माहेरच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या सासरच्या लोकांविरुद्ध हुंडाबळी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणी होत आहे.