
भावकीच्या मनात साचलेला टोकाचा मत्सर किती भयंकर आणि जीवघेणा असू शकतो, याचा थरकाप उडवणारा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आला आहे. चुलत भावाची आर्थिक परिस्थिती सुधारू लागली आणि त्याउलट आपलं कुटुंब मागे राहत असल्याच्या रागातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या धक्कादायक घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला असून, सिडको पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
रोहित संजय बन्सोड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याने आपलाच सख्खा चुलत भाऊ राजू रामू बन्सोड याची क्रूरपणे हत्या केली.

मत्सराची ठिणगी अन् हत्येचा कट

तपासात समोर आलेली माहिती अतिशय धक्कादायक आहे. मृत राजू बन्सोड याची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस सुधारत चालली होती, तर दुसरीकडे आरोपी रोहितचे कुटुंब मागे पडत होते. हाच टोकाचा मत्सर रोहितच्या मनात घर करून बसला. राजूचा काटा काढल्याशिवाय आपल्या मनाला शांती मिळणार नाही, या विचारातून रोहितने राजूला संपवण्याचा पद्धतशीर कट रचला.
हा खून कोणताही रागाच्या भरात अचानक झालेला नव्हता. आरोपी रोहितने दोन दिवस आधीच पाथ्री येथील एका निर्मनुष्य जंगलाची रेकी केली होती. हत्येसाठी कोणती जागा सुरक्षित आहे आणि पुरावा कुठे नष्ट करता येईल, याची त्याने आधीच पूर्ण पाहणी करून ठेवली होती.
“जंगलात सुरा लपवलाय, चल…” अन् घात झाला!
२३ मे रोजी आरोपी रोहितने आपला कट अंमलात आणला. त्याने राजू याला गाठले आणि जुन्या वादाचा बहाणा सांगून त्याला विश्वासात घेतले. “मी जंगलात एक सुरा लपवून ठेवला आहे, तो काढायला माझ्यासोबत चल,” अशी विनंती रोहितने राजूला केली. चुलत भावाच्या मनातील क्रूर डाव माहीत नसल्याने राजू देखील कोणतीही शंका न घेता त्याच्यासोबत पाथ्रीच्या जंगलात गेला.
जंगलाच्या निर्जन भागात पोहोचताच, रोहितने तिथे आधीच लपवून ठेवलेला तोच धारदार सुरा काढला आणि काही समजण्याच्या आत राजूवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. राजू रक्ताच्या थारोळ्यात पडेपर्यंत रोहित त्याच्यावर वार करत राहिला आणि त्याला जागीच संपवले.
सिडको पोलिसांची धडक कारवाई
या भयंकर घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. सिडको पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत गुन्ह्याचा छडा लावला आणि आरोपी रोहित बन्सोड याला बेड्या ठोकल्या. आपल्याच रक्ताच्या भावाने केलेल्या या कृत्यामुळे बन्सोड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नराधम आरोपीला फाशीची किंवा कठोर शिक्षा करण्याची मागणी नातेवाईकांनी केली असून पोलीस या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास करत आहेत.










