बँकॉक ते मुंबई सोन्याची तस्करी; विमानतळावरील बस चालकांच्या मदतीने चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश!

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत संचालनालय महसूल गुप्तचर विभागाने (DRI) सोन्याच्या तस्करीच्या एका मोठ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ‘ऑपरेशन गोल्डन नेक्सस’ (Operation Golden Nexus) अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) ही धडक कारवाई करण्यात आली.

या कारवाईत सुमारे ३.२ किलो परदेशी सोन्याची धूळ (वॅक्स स्वरूपात) जप्त करण्यात आली असून, तिची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत अंदाजे ५ कोटी रुपये आहे. या हाय-प्रोफाईल प्रकरणात परदेशी नागरिकांसह विमानतळावरील कर्मचाऱ्यांनाही अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

शरीरात सोनं लपवून आणायचा प्लॅन…

डीआरआयच्या अधिकाऱ्यांना बँकॉकहून मुंबईमार्गे सोन्याची मोठी तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार विमानतळावर सापळा रचण्यात आला. तपासादरम्यान असे समोर आले की, बँकॉकहून येणारे परदेशी नागरिक आपल्या शरीरामध्ये (कॅप्सूल किंवा वॅक्स स्वरूपात) सोनं लपवून मुंबई विमानतळावर आणत होते.

विमानतळ कर्मचाऱ्यांचे मोठे ‘कनेक्शन’!

या आंतरराष्ट्रीय तस्करांना विमानतळावरील काही कर्मचाऱ्यांचे मोठे पाठबळ होते. परदेशी नागरिकांनी आणलेले हे सोने विमानतळातून सुरक्षितपणे बाहेर काढण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यांवर होती.डीआरआयने कारवाईदरम्यान विमानतळावरील दोन बस चालक आणि एका कोच मॉनिटरला हे सोने प्रत्यक्ष ताब्यात घेऊन स्थानिक एजंटांकडे (रिसिव्हर) पोहचवताना रंगेहात पकडले.

एकूण ७ जणांना बेड्या; साखळी उद्ध्वस्त!

या कारवाईत डीआरआयने तस्करीच्या साखळीतील सर्व प्रमुख दुवे शोधून काढत एकूण ७ जणांना अटक केली आहे, ज्यामध्ये ३ बांगलादेशी आणि श्रीलंकन नागरिक (तस्करी करणारे), ३ विमानतळ कर्मचारी (मदत करणारे बस चालक व कोच मॉनिटर), १ स्थानिक रिसिव्हर (सोनं ताब्यात घेणारा एजंट) यांचा समावेश आहे

पुढील तपास सुरू

कस्टम्स कायदा, १९६२ (Customs Act) अंतर्गत डीआरआयने हे ५ कोटींचे सोने जप्त केले आहे. या आंतरराष्ट्रीय टोळीने आतापर्यंत अशा प्रकारे किती वेळा सोने भारतात आणले आहे, तसेच हे सोने मुंबईत कोणाकडे जाणार होते, याचा सखोल तांत्रिक तपास डीआरआयचे अधिकारी करत आहेत.