पैशासाठी नातं संपवलं! ३० लाखांच्या विम्यासाठी मेहुण्यानेच केली भाऊजींची हत्या

सध्या राज्यभरात धोंड्याचा महिना (अधिक मास) साजरा होत असून गावोगावी जावई आणि भाऊजींचे लाड केले जात आहेत. मात्र, सांगली जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. विम्याचे ३० लाख रुपये लाटण्यासाठी सख्ख्या मेहुण्यानेच आपल्या भाऊजींचा ३ लाख रुपयांची सुपारी देऊन खून केल्याचा प्रकार कवठेमहांकाळ तालुक्यातील चोरोची येथे उघडकीस आला आहे.सुरुवातीला हा केवळ एक रस्ता अपघात असल्याचा बनाव रचण्यात आला होता, मात्र पोलिसांनी अत्यंत चातुर्याने या ‘मर्डर मिस्ट्री’चा छडा लावला आहे.

नेमकी घटना काय?

१९ मे २०२६ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील चोरोची गावाजवळील ‘प्रेम ढाब्या’जवळ दत्तात्रय भगवान चावरे (वय ४४, रा. अभयनगर, सांगली) हे रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. सुरुवातीला हा घातपात नसून एखादा अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे झालेला अपघात असावा, अशी नोंद करण्यात आली होती.

असा उघड झाला खुनाचा कट

दत्तात्रय चावरे यांच्या शवविच्छेदन अहवालात आणि वैद्यकीय निष्कर्षात पोलिसांना काही संशयास्पद गोष्टी आढळल्या. डोक्यावरील जखमा अपघाताच्या नसून, गंभीर मारहाण केल्यामुळे झाल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर कवठेमहांकाळ पोलिसांनी तपासाची चक्र जलद फिरवली.पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीमंत करे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, या संपूर्ण थरारक कटाचा पर्दाफाश झाला.

३० लाखांचा विमा ठरला काळ

मयत दत्तात्रय चावरे यांच्या नावावर असलेला ३० लाखांचा विमा लाटण्यासाठी त्यांच्या सख्ख्या मेहुण्याने म्हणजेच रामचंद्र खिलारे याने तुकाराम सांगोलकर याला ३ लाख रुपयांची सुपारी दिली होती. दत्तात्रय यांना जबर मारहाण करून ठार मारले आणि त्यानंतर हा अपघात असल्याचा बनाव रचण्यात आला.
या प्रकरणी पोलिसांनी खालील दोन मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. रामचंद्र धनप्पा खिलारे (रा. अष्टविनायक नगर, विश्रामबाग, सांगली – मयताचा मेहुणा), तुकाराम मारुती सांगोलकर (रा. खेराव, ता. जत – सुपारी घेणारा) या दोन्ही आरोपींवर भारतीय न्याय संहिता २०२३ (BNS) मधील संबंधित कलमांनुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पोलीस पथकाची उल्लेखनीय कामगिरी

पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.या तपासात पोलीस निरीक्षक प्रविण कुमार कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोहेकॉ श्रीमंत करे, नागेश मासाळ, निवृत्ती कारंडे, अभिजित कटार, स्वप्नील पाटील तसेच सायबर पोलीस ठाण्यातील विजय पाटणकर व कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत या गुन्ह्याचा छडा लावला.