
खाकी वर्दीचा गैरवापर करून स्वतःला पोलीस उपनिरीक्षक (PSI) भासवणाऱ्या एका २५ वर्षीय तोतया तरुणीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. एका नामांकित खासगी क्लिनिकमध्ये डॉक्टरांची लवकर अपॉइंटमेंट मिळवण्यासाठी चक्क पीएसआयचा गणवेश परिधान करून रुबाब दाखवणाऱ्या या तरुणीचा लष्कर पोलिसांनी खेळ खल्लास केला. पुण्यातील कॅम्प परिसरात शनिवारी (६ जून) ही धडक कारवाई करण्यात आली.

खांद्यावर स्टार अन् अंगावर वर्दी…

समिना आसिफ इनामदार उर्फ समिना अयुब पठाण (वय २५) असे अटक करण्यात आलेल्या तोतया महिला पोलिसाचे नाव आहे. समिना हिला लहानपणापासूनच पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न होते, मात्र ते पूर्ण होऊ शकले नाही. सध्या ती एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. मात्र, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ती पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा गणवेश परिधान करून परिसरात फिरत नागरिकांवर उगाचच रुबाब झाडत असे.
असा झाला भांडाफोड…
६ जून रोजी लष्कर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे हे कर्मचाऱ्यांसह कॅम्प परिसरात नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. यावेळी एका खासगी क्लिनिकबाहेर पोलिसांच्या वर्दीत उभ्या असलेल्या या तरुणीवर त्यांची नजर पडली. मात्र, तिची एकूण देहबोली आणि हालचाली संशयास्पद वाटल्याने उपनिरीक्षक शिंदे यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने तिच्याकडे चौकशी सुरू केली.
पोलिसांचे ‘हे’ प्रश्न अन् बोलती बंद!
“कोणत्या पोलीस ठाण्यात कार्यरत आहात?”, “ओळखपत्र (आयडी कार्ड) कुठे आहे?”, “तुमचे वरिष्ठ अधिकारी कोण?” असे एकापाठोपाठ एक प्रश्न पोलिसांनी विचारताच समिनाची चांगलीच तारांबळ उडाली. पोलिसांच्या प्रश्नांची उत्तरे देताना तिची बोलती बंद झाली आणि ती प्रत्यक्षात पोलीस नसून तोतया असल्याचे उघड झाले. पोलिसांनी तात्काळ तिला ताब्यात घेतले.
डॉक्टरांच्या भेटीसाठी रचला ‘हा’ बनाव
पोलीस तपासात या कारवाईमागे अत्यंत धक्कादायक आणि तितकेच विचित्र कारण समोर आले आहे. समिनाला एका नामांकित डॉक्टरांकडून उपचार करून घ्यायचे होते. मात्र, त्या क्लिनिकमध्ये गर्दी असल्याने तिला लवकर अपॉइंटमेंट मिळत नव्हती. क्लिनिकच्या रिसेप्शनवरील कर्मचाऱ्यांवर आपल्या खाकी वर्दीचा प्रभाव पाडून, ‘स्पेशल ट्रिटमेंट’ मिळवत लवकर नंबर लावण्यासाठी तिने थेट पीएसआयची वर्दी शिवून घेतली आणि ती घालून तिथे पोहोचली.
लष्कर पोलिसांकडून गुन्हा दाखल
पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण न झाल्याने थेट तोतया अधिकारी बनून पोलिसांच्या वर्दीचा गैरवापर करणाऱ्या समिना विरोधात लष्कर पोलीस ठाण्यात कायदेशीर गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.










