भोंदूबाबा अशोक खरातचे अश्लील व्हिडिओ थेट परदेशात व्हायरल; सायबर पोलिसांची मोठी कारवाई

नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात याने पूजा विधीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर आता या गुन्ह्याची व्याप्ती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्याचे उघड झाले आहे. खरातने छुप्या कॅमेऱ्याच्या मदतीने रेकॉर्ड केलेले अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र सायबर सेलने आतापर्यंतची सर्वात मोठी मोहीम हाती घेतली आहे. हे आक्षेपार्ह व्हिडिओ पसरवणारे तब्बल ७४ टेलिग्राम ग्रुप्स आणि सोशल मीडिया खाती सायबर पोलिसांच्या रडारवर आली आहेत.

युद्धपातळीवर मोहीम; ४०६ आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या

महाराष्ट्र सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची गंभीर दखल घेत इंटरनेटवरून आक्षेपार्ह मजकूर हटवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.आतापर्यंत ४०६ आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावरून यशस्वीरित्या डिलीट करण्यात आले आहेत.या प्रकरणी ११ मोठ्या सोशल मीडिया कंपन्यांना (मध्यस्थांना) कायदेशीर नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.यापैकी २५ सोशल मीडिया खात्यांकडून पोलिसांना प्रतिसाद मिळाला असून पुढील तांत्रिक कारवाई वेगाने सुरू आहे.

धक्कादायक! अवघ्या २० रुपयांना विकले जात होते व्हिडिओ

सायबर पोलिसांच्या तपासात एक अत्यंत किळसवाणा आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही टेलिग्राम ग्रूप्सवर हे कथित अश्लील व्हिडिओ अवघ्या २० रुपयांसारख्या किरकोळ किमतीला डिजिटल माध्यमातून विकले जात होते. या प्रकरणी पोलिसांनी एका मुख्य संशयित आरोपीची ओळख पटवली असून, सध्या त्याची कसून पडताळणी केली जात आहे.

पोलिसांच्या तांत्रिक तपासात समोर आले आहे की, या व्हिडिओंचा प्रसार केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही. हे व्हिडिओ युएई (UAE), श्रीलंका, फिलिपाईन्स आणि नायजेरिया या देशांमध्येही पोहोचले आहेत. याशिवाय, भारतातील तब्बल २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे व्हिडीओ व्हायरल झाल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.

सायबर पोलिसांचं नागरिकांना कडक आवाहन!

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता महाराष्ट्र सायबर पोलिसांनी नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची चेतावणी जारी केली आहे. नागरिकांनी असे कोणतेही आक्षेपार्ह व्हिडिओ डाउनलोड, खरेदी किंवा कोणालाही फॉरवर्ड करू नयेत. अशा अश्लील व्हिडिओंचा प्रसार करणे, ते सोशल मीडियावर पोस्ट करणे किंवा मोबाईलमध्ये बाळगणे हा आयटी ॲक्टनुसार (IT Act) अजामीनपात्र गंभीर गुन्हा आहे.सोशल मीडियावर अशी कोणतीही लिंक, टेलिग्राम ग्रुप किंवा संशयास्पद खाते आढळल्यास त्याची माहिती तत्काळ सायबर पोलिसांच्या अधिकृत पोर्टलवर देऊन तक्रार नोंदवावी. या संपूर्ण आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी महाराष्ट्र सायबर पोलिसांचे विशेष पथक पुढील सखोल तपास करत आहे.