लोणीकंद पोलिसांची मध्यरात्री ‘प्रोजेक्ट एक्स’ रेव्ह पार्टीवर धाड; ४९ तरुणींसह १५६ जण ताब्यात, ८५ लाखांचा मुद्देमाल जप्त!

पुण्यात पुन्हा एकदा हाय-प्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तुळापूर परिसरातील एका आलिशान फार्महाऊसवर सुरू असलेल्या ‘प्रोजेक्ट एक्स हाऊस पार्टी’वर लोणीकंद पोलिसांनी धाड टाकत तब्बल १५६ जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये १०७ पुरुष आणि ४९ तरुणींचा समावेश असून पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे ८५ लाख रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. पोलीस प्रशासनाने लागू केलेल्या जमावबंदीच्या आदेशाचे आणि वेळेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करून ही पार्टी सुरू होती.

पहाटे २.३० वाजता पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक!

मिळालेल्या माहितीनुसार, आळंदी-मार्कल रोडवरील (तुळापूर परिसर) एका बंगल्यात शनिवारी (६ जून) रात्रीपासून ‘प्रोजेक्ट एक्स’ नावाने एका हाय-प्रोफाईल पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये मोठ्या आवाजात डीजे वाजवून अंमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.माहिती मिळताच लोणीकंद पोलीस आणि गुन्हे शाखेच्या १५ अधिकारी आणि ६५ अंमलदारांच्या भव्य पथकाने रविवार, ७ जून रोजी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास या बंगल्यावर अचानक छापा टाकला. पोलिसांची धाड पडताच पार्टीत उपस्थित असलेल्या तरुण-तरुणींची एकच पळापळ झाली.

८५ लाखांचा मुद्देमाल, गांजा आणि हुक्का जप्त

पोलिसांनी घटनास्थळाची झडती घेतली असता तिथे मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आणि दारूचा साठा आढळून आला. पोलिसांनी कारवाईदरम्यान खालील मुद्देमाल जप्त केला आहे

अंदाजे ३ ग्रॅम गांजा आणि अंमली पदार्थांशी संबंधित संशयास्पद साहित्य.

३ कप पॉटमध्ये ठेवलेले १० प्रतिबंधित हुक्का फ्लेवर्स.

सुमारे ९,२२,००० रुपये किमतीचा विदेशी दारूचा साठा.

डिजे सिस्टीम, महागड्या गाड्या आणि इतर साहित्यासह एकूण ८५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नियमांची ऐशीतैशी; अल्पवयीन मुलांचाही समावेश!

तपासात असे समोर आले आहे की, या पार्टीसाठी प्रशासनाकडून मिळालेला दारू विक्रीचा तात्पुरता परवाना (One Day Permit) फक्त शनिवार, ६ जूनच्या रात्री ११.३० वाजेपर्यंतच वैध होता. मात्र, आयोजकांनी नियमांना केराची टोपली दाखवत मध्यरात्रीनंतरही पार्टी सुरूच ठेवली. धक्कादायक बाब म्हणजे ताब्यात घेतलेल्यांमध्ये ३ जण २१ वर्षांपेक्षा कमी वयाचे (अल्पवयीन) आहेत, तर या ठिकाणी बालकामगारांकडून काम करून घेतले जात असल्याचाही आरोप आहे.

मुख्य आयोजक पोलिसांच्या ताब्यात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयमान शेख (ब्लेझ एंटरटेनमेंट) आणि यश चौधरी (स्टार लाईट एंटरटेनमेंट) हे या रेव्ह पार्टीचे मुख्य आयोजक आहेत. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

बंगला मालकासह बाउन्सर्सवर गुन्हे दाखल

या प्रकरणी बंगल्याचे मालक नरेंद्र चूघ, आयोजक आयमान शेख आणि यश चौधरी यांच्यासह पार्टीत सहभागी झालेले तरुण-तरुणी, बाउन्सर, बार टेंडर आणि हाऊसकीपिंग मॅनेजमेंटवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींवर एनडीपीएस कायदा (NDPS Act), बालकामगार प्रतिबंधक कायदा, आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कडक कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.