माहेरून आणून पत्नीला ४ तास ‘कोंबडा’ बनवलं; पट्ट्याने बेदम मारहाण; पळून जाताच भररस्त्यात चाकूने सपासप वार!

मुंबईतील चेंबूर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक कौटुंबिक छळाची घटना समोर आली आहे. माहेरी गेलेल्या पत्नीला जीन्स पॅन्ट आणि अत्तरची बाटली खरेदी करून देण्याच्या बहाण्याने घरी आणून, एका विकृत पतीने तिला बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर तिला घरात डांबून सलग चार तास ‘कोंबडा’ बनवून ठेवले.

या छळातून पत्नीने कशीबशी सुटका करून पळ काढला, मात्र नराधम पतीने तिचा पाठलाग करत भररस्त्यात चाकूने सपासप वार केले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली होती. आरसीएफ पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. अरबाज अन्वरअली सय्यद (वय ३०) असे अटक करण्यात आलेल्या अट्टल आरोपीचे नाव आहे. आरोपी अरबाजवर यापूर्वीच तब्बल १८ गंभीर गुन्हे नोंद आहेत.

हद्दपार असूनही शहरात दाखल; खरेदीच्या बहाण्याने रचला सापळा

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अरबाजला डिसेंबर २०२५ पासून १२ महिन्यांकरिता मुंबईतून हद्दपार (तडीपार) करण्यात आले होते. पतीच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे आणि त्याला दारू, गांजाचे व्यसन असल्यामुळे पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असत. त्यामुळे त्याची २५ वर्षीय पत्नी मुलांसह तिच्या आई-वडिलांकडे (माहेरी) राहण्यास गेली होती.परंतु, गुरुवारी अरबाजने हद्दपारीचा आदेश झुगारून थेट पत्नीच्या माहेरी गाठले. त्याने “तुला नवीन जीन्स पॅन्ट आणि अत्तरची बाटली खरेदी करून देतो,” असा बहाणा केला आणि पत्नीला विश्वासात घेऊन चेंबूर येथील घरी आणले.

४ तास ‘कोंबडा’ बनवले; ॲसिड फेकण्याची धमकी

चेंबूरच्या घरात पोहोचताच अरबाजचे खरे रूप समोर आले. त्याने पत्नीला घरात कोंडले आणि अमानुष छळ सुरू केला. शिवीगाळ करत त्याने तिला लाथाबुक्क्यांनी आणि पट्ट्याने बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, तिला तलवारीने मारण्याची आणि अंगावर ॲसिड फेकण्याची धमकी देत तब्बल चार तास घरात ‘कोंबडा’ बनवून ठेवले. तसेच मुलांसह तिच्या आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी दिली.

पतीला डुलकी लागली अन् पत्नीने ठोकली धाव

रात्री साडेआठ वाजेपर्यंत अरबाजने पत्नीला घरात कोंडून ठेवले होते. मात्र, रात्री नऊच्या सुमारास अरबाजला दारूच्या नशेत डुलकी लागल्याचे पत्नीच्या लक्षात आले. हीच संधी साधून तिने अत्यंत शिताफीने घरातून पळ काढला आणि थेट माहेर गाठले.

भररस्त्यात चाकू हल्ला; नागरिकांमध्ये घबराट

पत्नी घरातून पळून माहेरी गेल्याचे समजताच अरबाजचा थरकाप उडाला. तो तातडीने तिच्या माहेरी पोहोचला. घरातून पळून आल्याच्या रागात त्याने पत्नीला रस्त्यावरच गाठून मारहाण सुरू केली आणि सोबत आणलेल्या चाकूने तिच्यावर सपासप वार केले. यावेळी त्याने हातातील चाकू हवेत भिरकावून, “कोणी मध्ये आले तर याद राखा,” अशी धमकी तिथे जमलेल्या लोकांना दिली. आरोपीच्या दहशतीमुळे नागरिक घाबरून सैरावैरा पळून गेले आणि महिलेच्या मदतीला कोणीही पुढे आले नाही.

पोलीस वेळेत पोहोचले अन् आरोपी जेरबंद

या घटनेची माहिती मिळताच आरसीएफ पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करत आरोपी अरबाज सय्यदला जागीच ताब्यात घेतले आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. जखमी महिलेला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.