
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील घोडपेठ परिसरात एका क्रूर हत्येचा खुलासा झाला असून, पत्नीनेच १ लाख रुपयांची सुपारी देऊन पतीचा खून केल्याचे समोर आले आहे. या थरारक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी पत्नीसह चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

शाळेजवळ आढळला मृतदेह

२ मे रोजी घोडपेठ येथील कर्मवीर शाळेजवळ असलेल्या हनुमान मंदिराशेजारी एका इसमाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. भद्रावती पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असता, मृताची ओळख रविंद्र तुळशिराम कुळमेथे (वय ४६, रा. गडचिरोली) अशी पटली.
कारमध्येच आवळला गळा
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, १ मे रोजी आरोपींनी रविंद्र कुळमेथे यांना एका कारमध्ये बसवून घोडपेठ येथील निर्जन ठिकाणी नेले. तिथे कारमध्येच त्यांचा गळा आवळून निर्घृण हत्या करण्यात आली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शाळेच्या परिसरात फेकून आरोपी पसार झाले होते.
१ लाखात दिला संसाराचा बळी
स्थानिक गुन्हे शाखा आणि भद्रावती पोलिसांनी संयुक्तपणे तपास केला असता धक्कादायक वास्तव समोर आले. मृतक रविंद्र यांची पत्नी दिपमाला कुळमेथे हिनेच पतीला संपवण्यासाठी १ लाख रुपयांची सुपारी दिली होती. तिने या कामासाठी वर्षा परचाके, सोनू उर्फ प्रविण कालोकर आणि नाझीर अंसारी या तिघांची मदत घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांची कारवाई आणि अटक
गुन्ह्याचा उलगडा होताच पोलिसांनी वेगाने हालचाली करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. दिपमाला कुळमेथे आणि वर्षा परचाके यांना वरोरा येथून अटक करण्यात आली. सोनू उर्फ प्रविण कालोकर आणि नाझीर अंसारी यांना नागपूर येथून जेरबंद करण्यात आले. पोलिसांनी या कारवाईत हत्येसाठी वापरलेली मारुती कार आणि तीन मोबाईल जप्त केले आहेत. सर्व आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून या हत्येमागील नेमके कारण काय, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.










