जालन्यात ‘खून का बदला खून’!; बापाच्या मारेकऱ्याचा मुलानेच काढला काटा

जालना शहरात ‘सूडाचा प्रवास’ रक्ताच्या थारोळ्यात संपल्याची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या बापाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी एका अल्पवयीन मुलाने आपल्या साथीदाराच्या मदतीने भररस्त्यात एका ३५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या केली. जालन्यातील चंदनझीरा परिसरातील एकता चौकात गुरुवारी सायंकाळी हा थरार घडला.

नेमकं प्रकरण काय?

जितेंद्र रवी अडसूळ (वय ३५, रा. बदनापूर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. जितेंद्र हा दोन वर्षांपूर्वी झालेल्या एका खून प्रकरणातील मुख्य आरोपी होता. सूत्रांच्या माहितीनुसार, जितेंद्रने ज्या व्यक्तीची हत्या केली होती, त्याच व्यक्तीच्या मुलाने आता आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतला आहे.

पत्नीला भेटायला आला आणि मृत्यूने गाठले

जितेंद्र अडसूळ हा गुरुवारी सायंकाळी आपल्या पत्नीला भेटण्यासाठी जालना शहरातील चंदनझीरा येथील एकता चौक परिसरात आला होता. तो पत्नीला भेटणार इतक्यात दबा धरून बसलेल्या दोन अल्पवयीन मुलांनी त्याच्यावर अचानक धारदार शस्त्राने हल्ला चढवला. हा हल्ला इतका भीषण होता की जितेंद्र रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.

पोलीस कारवाई आणि पुढील तपास

भररस्त्यात झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. जखमी जितेंद्रला तातडीने उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.चंदनझीरा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने चक्र फिरवली आणि दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत, ताब्यात घेतलेल्या मुलांपैकी एकाच्या वडिलांचा खून जितेंद्रने केला होता, त्याचाच बदला म्हणून हे कृत्य केल्याची कबुली समोर आली आहे.

‘सूडाचे चक्र’ जालना हादरले

दोन वर्षांपूर्वीचे जुने वैमनस्य आजही धगधगत होते, हे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. भरवस्तीत आणि वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या खुनामुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, यामागे आणखी कोणाचे चिथावणीखोर हात आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.