पुण्यात राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दशक्रिया विधीच्या कार्यक्रमावरून परतत असताना काही जणांनी लवांडे यांना निर्जनस्थळी अडवून त्यांच्यावर शाईफेक केली. इतकेच नाही तर, “आमच्या गुरुवर्यांबद्दल बोललात तर लक्षात ठेवा,” अशी धमकी देत पिस्तूल दाखवून त्यांना मारहाण करण्याचाही प्रयत्न झाला आहे. या घटनेमुळे पुण्यासह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

निर्जनस्थळी गाठून हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, विकास लवांडे हे एका दशक्रिया विधीच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून परतत असताना वाटेत एका निर्जनस्थळी हल्लेखोरांनी त्यांना अडवले. वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि त्यांच्यासोबत असलेल्या दोन-तीन गुंडांनी हा हल्ला केल्याचा आरोप लवांडे यांनी केला आहे.

‘ते आमचं सर्वस्व आहेत…’
हल्ल्याचा एक व्हिडिओ समोर आला असून, त्यामध्ये हल्लेखोर लवांडे यांना धमकावताना दिसत आहेत. “तू आमच्या गुरुवर्यांना बोलायचं नव्हतं, ते आमचं सर्वस्व आहेत. परत जर आमच्या गुरुवर्यांना काही बोलला ना तर लक्षात ठेव,” असा इशारा देत संग्राम भंडारे आणि त्याच्या साथीदारांनी लवांडे यांच्या अंगावर शाई फेकली. यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली आणि पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचा दावा लवांडे यांनी केला आहे.

राजकीय वैमनस्यातून हल्ला?
विकास लवांडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आक्रमक प्रवक्ते म्हणून ओळखले जातात. विविध विषयांवर ते आपली भूमिका स्पष्टपणे मांडत असतात. मात्र, त्यांनी केलेल्या कोणत्या वक्तव्यामुळे हा हल्ला झाला, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. वारकरी संप्रदायाचा उल्लेख करत हा हल्ला झाल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

पोलिसांकडून चौकशी सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. विकास लवांडे यांनी संबंधित हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भरदिवसा एका राजकीय नेत्यावर अशा प्रकारे हल्ला झाल्याने पुण्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या हल्ल्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार गट) केला जात असून, आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे.