नाशिक TCS धर्मांतर प्रकरण: ४० दिवसांचा लपंडाव संपला! ‘मास्टरमाईंड’ निदा खानला निर्जनस्थळी पोलिसांनी कसं घेरलं?

नाशिकमधील बहुचर्चित धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी, टीसीएसची माजी एचआर निदा खान हिला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या ४० दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारी निदा खान छत्रपती संभाजीनगरमधील एका निर्जन भागात लपली होती. नाशिक एसआयटी आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला मध्यरात्री बेड्या ठोकल्या.

निर्जन स्थळी ‘डेडलॉक’ लोकेशन, पण पोलिसांची नजर चुकली नाही!
निदा खानने अटकेपासून वाचण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरातील कौसर कॉलनी हे अत्यंत वेगळे ठिकाण निवडले होते. ज्या इमारतीत ती लपली होती, तिच्या आजूबाजूला लांबलांबपर्यंत एकही घर नव्हते. अत्यंत शांत आणि निर्जन भाग असल्याने कोणाला संशय येण्याची शक्यताच नव्हती.

मात्र, तांत्रिक तपासाच्या जोरावर नाशिक पोलिसांनी तिचे लोकेशन ट्रेस केले. सलग दोन दिवस पोलीस साध्या वेशात त्या इमारतीवर लांबून नजर ठेवून होते. जेव्हा निदा फ्लॅटमध्येच असल्याची खात्री पटली, तेव्हा पोलिसांनी छापा टाकून तिला कुटुंबासह ताब्यात घेतले.

न्यायालयात फसला ‘प्रेग्नन्सी’चा बनाव
अटक टाळण्यासाठी निदा खानने सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब केला होता. तिने आपण गरोदर असल्याचे सांगत आणि काही वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर करत न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, नाशिक जिल्हा न्यायालयाने हे प्रकरण केवळ वैयक्तिक वाद नसून एका ‘आंतरराष्ट्रीय सिंडिकेट’चा भाग असल्याचे निरीक्षण नोंदवत तिचा जामीन फेटाळला होता. जामीन फेटाळल्याच्या अवघ्या ७२ तासांत पोलिसांनी ही मोठी कारवाई केली.

काय आहे नेमकं प्रकरण?
नाशिकमधील टीसीएस कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणाला लग्नाचं आमिष दाखवून, त्याचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचा आणि त्याचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप निदा खानवर आहे. या प्रकरणात ‘लव्ह जिहाद’ आणि संघटित रॅकेटचे धागेदोरे असल्याचे समोर आल्याने नाशिक पोलिसांनी एसआयटी स्थापन केली होती.

आता मोठे खुलासे होण्याची शक्यता
निदा खानच्या अटकेनंतर आता या प्रकरणातील ‘आंतरराष्ट्रीय कनेक्शन’ उघड होण्याची दाट शक्यता आहे. तिला नाशिकमध्ये आणल्यानंतर पोलीस कोठडीत तिची कसून चौकशी केली जाणार आहे. या सिंडिकेटमध्ये आणखी कोणाकोणाचा समावेश आहे? आणि यामागे नेमका काय उद्देश होता? यावरून आता पडदा उठणार आहे.