
मराठवाड्यातील अविवाहित तरुणांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या भारती गुमस्ते या तरुणीला पोलिसांनी अटक केली असून, तिचा एक खळबळजनक व्हिडिओ समोर आला आहे. “मी ९ लग्ने स्वखुशीने केली नाहीत, तर मला ती करायला भाग पाडलं गेलं,” असा दावा भारतीने केल्याने खळबळ उडाली आहे.

धमकी देऊन लावलं ९ वेळा लग्न!
भारती गुमस्ते हिने व्हिडिओमध्ये आपल्या हतबलतेचा पाढा वाचला आहे. तिने यामागे एका मोठ्या टोळीचा हात असल्याचा आरोप केला आहे. भारतीने दिलेल्या माहितीनुसार अर्चना पाटील, तिचा मुलगा सागर, गणेश अंदुरे आणि त्याची पत्नी राधा अंदुरे या चौघांनी मिळून हे रॅकेट चालवले.

“तुला वडील नाहीत, तुझा एकुलता एक भाऊ आहे. जर तू आम्ही सांगू तिथे लग्न केलं नाहीस, तर तुझ्या भावाला मारून टाकू,” अशी धमकी हे चौघे तिला सतत द्यायचे. ८ वेळा जबरदस्तीने लग्न लावून दिल्यानंतर हे चौघे भारतीला परत घेऊन यायचे. तिने विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण भावाच्या जिवाखातर ती या धमक्यांना बळी पडली.
कसा झाला भांडाफोड?
भारतीचे आठ वेळा लग्न आणि त्यानंतर लूट झाली होती. मात्र, नव्या लग्नानंतर सत्य समोर आलं. भारतीच्या नवव्या पतीला तिचा ‘इन्स्टाग्राम आयडी’ मिळाला. त्यावरून त्याने तिला जाब विचारला आणि विश्वासात घेऊन सर्व खरं सांगण्यास सांगितलं. भारतीने आपल्या पतीसमोर सर्व गुपितं उघड केली आणि तिथूनच या मोठ्या रॅकेटचा तपास सुरू झाला.
कुटुंबाचा संबंध नाही?
भारतीने आपल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले आहे की, या प्रकरणाशी तिच्या आईचा, बहिणींचा किंवा भावाचा कोणताही संबंध नाही. “माझ्या घरची परिस्थिती बेताची आहे, मला वडील नाहीत. याच हतबलतेचा फायदा गावातील अर्चना पाटील आणि तिच्या साथीदारांनी घेतला,” असे तिने नमूद केले.
लग्नानंतर व्हायची आर्थिक लूट
ही टोळी मराठवाड्यातील गावाकडच्या अशा तरुणांना शोधायची ज्यांची लग्ने जमण्यास अडचण येत आहे. त्यानंतर भारतीचे लग्न लावून दिले जायचे. लग्नानंतर काही दिवसांतच दागिने आणि पैसे घेऊन भारतीला पळवून नेले जायचे किंवा ती स्वतः तिथून निघून यायची.
पोलिसांसमोर मोठं आव्हान
भारतीच्या या खुलाशानंतर आता पोलीस त्या चारही आरोपींचा शोध घेत आहेत. हे रॅकेट फक्त ९ लग्नांपुरते मर्यादित आहे की यामागे आणखी काही पीडित मुली आणि फसवणूक झालेले तरुण आहेत, याचा तपास आता बीड पोलीस करत आहेत.










