सोलापुरात ‘मनोहर मामा’नंतर आणखी एका भोंदू बाबाचा भांडाफोड; ‘पैशांचा पाऊस’ पाडण्याचं आमिष दाखवणाऱ्या वीरकर महाराजला बेड्या!

सोलापूर जिल्ह्यात मनोहर मामा भोसलेच्या अटकेनंतर आता आणखी एका स्वयंघोषित आध्यात्मिक गुरूचा पर्दाफाश झाला आहे. माढा तालुक्यातील आडेगाव येथील नाना महाराज उर्फ गुरुमाऊली वीरकर याला टेंभुर्णी पोलिसांनी आज पहाटे साखर झोपेत असतानाच आश्रमातून उचलले. ‘पैशांचा पाऊस पाडतो’ आणि ‘भविष्य बदलतो’ असे आमिष दाखवून भक्तांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप या वीरकर महाराजवर ठेवण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
पंढरपूर तालुक्यातील एका पीडित तरुणाने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. २०१४ पासून वीरकर महाराज याने पीडिताला आपल्या जाळ्यात ओढले होते. “माझ्याकडील कासव घे, व्यवहारात भरपूर पैसे मिळवून देतो, पैशांचा पाऊस पाडतो,” असे सांगून महाराजांनी पीडिताकडून वेळोवेळी पैसे उकळले. मात्र, व्यवसाय वाढण्याऐवजी पीडितावर कर्जाचा डोंगर वाढत गेला. ५ लाख रुपयांहून अधिक फसवणूक झाल्याचा दावा पीडिताने केला आहे.

पहाटेच पोलिसांची ‘सर्जिकल स्ट्राईक’
दोन लाख ३५ हजार रुपयांच्या फसवणुकीची प्राथमिक तक्रार प्राप्त होताच टेंभुर्णी पोलिसांनी वेगाने चक्र फिरवली. आज पहाटे जेव्हा गुरुमाऊली वीरकर आणि त्याचा मोठा भाऊ विकास वीरकर हे आडेगाव येथील आश्रमात साखर झोपेत होते, तेव्हाच पोलिसांनी धाड टाकत दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्यावर जादूटोणा विरोधी कायदा आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

राजकीय नेत्यांचा वावर अन् भोंदूगिरीचे बस्तान
आडेगाव येथील या आश्रमात अनेक बड्या राजकीय नेत्यांचा राबता असायचा. मोठ्या नेत्यांशी असलेले संबंध आणि त्यांच्यासोबतचे फोटो दाखवून वीरकर महाराज लोकांवर आपली छाप पाडायचा. याच राजकीय वलयाचा वापर करून तो जादूटोणा आणि भविष्य सांगण्याच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलीस अधीक्षकांचे आवाहन
या कारवाईनंतर सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. “ज्या कोणाची या भोंदू बाबांनी फसवणूक केली असेल, त्यांनी न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे.