भंडारा हादरला! ५० वर्षीय नराधमाकडून १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पीडिता ४ महिन्यांची गर्भवती

भंडारा जिल्ह्यातील लाखनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका ५० वर्षीय नराधमाने शेजारी राहणाऱ्या १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या पाशवी कृत्यामुळे पीडित मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिली असून, या घटनेने संपूर्ण भंडारा जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना डिसेंबर महिन्यात घडली होती. पीडित मुलगी आपल्या घराशेजारी राहणाऱ्या रतनलाल उर्फ जागेश्वर सुरचंद कुळमते (वय ५० वर्ष) याच्या घरी भाजी आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीच्या घरात कोणीही नसल्याची संधी साधून, त्याने या चिमुरडीवर बळजबरीने अत्याचार केला.

“आई-वडिलांना जीवे मारू”, आरोपीची धमकी

अत्याचार केल्यानंतर नराधम रतनलालने या चिमुरडीला धमकावले होते. “ही घटना कोणालाही सांगितल्यास तुझ्या आई-वडिलांना जीवे मारून टाकू,” अशी धमकी दिल्याने पीडित मुलगी प्रचंड दहशतीखाली होती. आरोपीच्या भीतीपोटी तिने अनेक महिने हे दुःख मनातच साठवून ठेवले.

वैद्यकीय तपासणीत फुटलं भांडं

काही दिवसांपूर्वी पीडितेच्या प्रकृतीत अचानक बदल जाणवू लागल्याने कुटुंबीयांनी तिची वैद्यकीय तपासणी केली. यावेळी ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले. हा धक्कादायक प्रकार समजताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. या धक्क्यातून सावरल्यानंतर पीडितेच्या वडिलांनी तातडीने लाखनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

आरोपी जेरबंद, परिसरात संताप

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपी रतनलाल उर्फ जागेश्वर कुळमते याला अटक केली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. “अशा नराधमांना समाजात स्थान नाही, शासनाने जलदगतीने खटला चालवून आरोपीला कठोर शासन करावे,” अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.देशात आणि राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना, भंडाऱ्यातील या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.