
शिर्डीतील बहुचर्चित आणि वादग्रस्त जमीन खरेदी-विक्री व्यवहार प्रकरणात अडकलेला भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. पोलीस कोठडीत असलेल्या खरातची चौकशी सुरू असताना शुक्रवारी तपास यंत्रणांसमोर हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. साक्षीदार आणि खरात आमनेसामने आल्यानंतर दोघांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली.

‘तुमच्यामुळेच मी अडकलो’; खरातचा साक्षीदारांवर खापर फोडण्याचा प्रयत्न

गेल्या पाच दिवसांपासून पोलिसांच्या प्रश्नांच्या सरबत्तीला तोंड देणाऱ्या खरातचा संयम शुक्रवारी सुटला. पोलिसांनी जेव्हा या प्रकरणातील महत्त्वाचे साक्षीदार सचिन वाणी, प्रभाकर गुंजाळ, भाऊसाहेब चौधरी आणि जमीन मालक रावसाहेब गोंदकर यांना खरातसमोर बसवले, तेव्हा खरात संतापला. “तुमच्यामुळेच मी या वादात आणि पोलीस चौकशीत अडकलो आहे,” असा आरोप करत त्याने संपूर्ण प्रकरणाचे खापर साक्षीदारांवर फोडण्याचा प्रयत्न केला.
साक्षीदारांनी काढली जुनी ‘कुंडली’; मोठ्या अधिकाऱ्यांची नावे चर्चेत
खरातच्या या आरोपानंतर साक्षीदारही गप्प बसले नाहीत. त्यांनी पोलिसांसमोरच खरातला चांगलेच झापले. “आम्ही व्यवहार रद्द करण्याची मागणी आधीच केली होती, पण तेव्हा तुम्ही मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे सांगून आमची तोंडे बंद केली होती,” असा खळबळजनक खुलासा साक्षीदारांनी केला. या खुलाशामुळे खरातने या आर्थिक व्यवहारात केवळ फसवणूकच केली नाही, तर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा धाक दाखवून दबाव निर्माण केल्याचेही समोर आले आहे.
तपासाचा वेग वाढला; बड्या धेंडांचे धाबे दणाणले
शनिवारी खरातची पोलीस कोठडी संपत असल्याने पोलिसांनी तपासाचा वेग प्रचंड वाढवला आहे. आर्थिक व्यवहार, जमिनीचे दस्तऐवज आणि या व्यवहारातील मध्यस्थ यांची कसून चौकशी केली जात आहे. साक्षीदारांच्या दाव्यानुसार, जर खरातने खरोखरच मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा गैरवापर केला असेल, तर या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची आणि अनेक बड्या व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
शिर्डी येथील एका मौल्यवान जमिनीच्या व्यवहारात फसवणूक आणि आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका अशोक खरातवर आहे. या व्यवहारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचा संशय असून, भोंदूगिरीच्या नावाखाली खरातने अनेक जमिनी बळकावल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत.










