
न्यायालयात साक्ष देण्यासाठी जाणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीत उघडकीस आला आहे. आरोपींनी हत्येनंतर हा प्रकार आत्महत्येचा वाटावा यासाठी मृतदेह कर्नाटकात नेऊन झाडाला लटकवला होता. मात्र, कवठेमहांकाळ पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने अवघ्या १२ तासांत या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे.

मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, त्यात एका राजकीय पदाधिकाऱ्याचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. रोहित बाळासाहेब पाटोळे (युवासेना शहरप्रमुख, शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष, कवठेमहांकाळ), ज्ञानु अण्णाप्पा खोत (वय २५, रा. कोगनोळी), हर्षद दाजी पैलवान (वय ३०, रा. तासगाव/कवठेमहांकाळ) या व्यतिरिक्त स्वप्नील खुळे आणि अमर खताळ हे दोन आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत
काय आहे नेमकं प्रकरण?
जत तालुक्यातील कोसारी येथील दादसो नामदेव यमगर (वय ५०) हे एका जुन्या दुहेरी खून प्रकरणातील मुख्य साक्षीदार होते. ५ मे २०२६ रोजी सकाळी ते सांगली न्यायालयात साक्ष देण्यासाठी निघाले होते. मात्र, नागज फाटा येथून एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीतून आलेल्या आरोपींनी त्यांचे अपहरण केले.
कर्नाटकात हत्या आणि आत्महत्येचा बनाव
अपहरणानंतर आरोपींनी यमगर यांना कर्नाटक राज्यातील अथणी जवळील मदभावी येथील एका शेतात नेले. तिथे त्यांची निर्घृण हत्या केल्यानंतर, आरोपींनी त्यांचा मृतदेह झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत लटकवून दिला. हा खुनाचा प्रकार नसून आत्महत्या आहे, असा पोलिसांचा आणि नातेवाईकांचा समज करून देण्याचा आरोपींचा प्रयत्न होता.
पोलिसांची ‘थर्ड आय’ तपासणी आणि कारवाई
कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातील डीबी पथकाचे श्रीमंत करे यांना मिळालेल्या माहितीवरून तपासाची चक्रे वेगाने फिरली. तांत्रिक विश्लेषण आणि संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई
विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविणकुमार कांबळे, सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय कोळेकर आणि त्यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली.










