सोरतापवाडीत अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांचा अत्याचार

विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहे. विशेषतः महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, आता हवेली तालुक्यातील सोरतापवाडीतून एक संतापजनक घटना समोर आली आहे. नर्सरीत काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला गाठून दोन नराधमांनी तिच्यावर अत्याचार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

हवेली तालुक्यातील सोरतापवाडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. पीडित मुलगी येथील एका नर्सरीत कामाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून या पीडित मुलीचा पाठलाग करत होते आणि तिला मानसिक त्रास देत होते. घटनेच्या दिवशी, संधी मिळताच आकाश रामहरी ओव्हाळ आणि अभिजीत खंडागळे या दोन नराधमांनी तिला एका निर्जन स्थळी गाठले. तेथील मातीच्या ढिगाऱ्याच्या आडोशाला तिला जबरदस्तीने ओढून नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. या अघोरी कृत्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

आरोपींना बेड्या, ‘पॉक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल

पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ हालचाली करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.आकाश रामहरी ओव्हाळ आणि अभिजीत खंडागळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पुण्यातील उरुळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.