पत्नी घर सोडून गेली अन् बाप बनला ‘हैवान’; ३ वर्षांच्या चिमुरडीचा खून, ५ वर्षांचा मुलगा मृत्यूच्या दाढेतून परतला

In the modern criminal justice system, there are two types of homicide: murder and manslaughter.

ज्या बापाने लेकरांचे रक्षण करायचे, तोच बाप त्यांचा ‘काळ’ बनल्याची एक सुन्न करणारी घटना पुणे-नाशिक महामार्गावरील संतवाडी परिसरात उघडकीस आली आहे. पत्नी सोडून गेल्याच्या नैराश्यातून पित्याने आपल्या दोन चिमुकल्यांना जंगलात नेऊन संपवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ३.५ वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी अंत झाला, तर ५ वर्षांचा मुलगा दैवत बलवत्तर म्हणून मृत्यूच्या दारातून सुखरूप परतला आहे.

फिरायला नेतो सांगून गाठलं निर्जन जंगल
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सागर सदाशिव शिंदे (वय २९, रा. मोशी) याची पत्नी सहा महिन्यांपूर्वी कौटुंबिक वादातून घर सोडून गेली होती. दोन लहान मुलांचा सांभाळ करताना तो मानसिक तणावात होता. ५ मे रोजी सकाळी ‘फिरायला नेतो’ असे सांगून त्याने मुलगा आर्यन (५ वर्ष) आणि मुलगी हर्षदा (३.५ वर्ष) यांना घराबाहेर नेले. रात्रीच्या अंधारात त्याने आळेफाटा जवळील संतवाडी येथील निर्जन जंगल गाठले आणि क्रूरतेचा कळस गाठला.

मुलाला मृत समजून जंगलात फेकल, लेकीचा गळा आवळला!
नराधम बापाने आधी ५ वर्षांच्या आर्यनचा गळा दाबला. आर्यन बेशुद्ध पडताच तो मेला असे समजून सागरने त्याला झुडपात फेकून दिले. त्यानंतर त्याने आपली ३ वर्षांची मुलगी हर्षदा हिचा निर्घृणपणे गळा आवळून खून केला आणि तिचा मृतदेह झाडाझुडपात लपवून तो पसार झाला.

कसा उघड झाला हा थरार?
बुधवारी सकाळी जंगलात आर्यन रडत असताना काही स्थानिकांना आढळला. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. आर्यनने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी वडील सागर शिंदेला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल केली, पण खाकी वर्दीचा हिसका दाखवताच त्याने आपल्या पोटच्या लेकीची हत्या केल्याची कबुली दिली. त्याच्या कबुलीनंतर पोलिसांनी हर्षदाचा मृतदेह ताब्यात घेतला.

पोलिसांची कारवाई
आळेफाटा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीवर भारतीय न्याय संहितेअंतर्गत खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आई घराबाहेर आणि वडिलांनीच काळ बनून लेकीला संपवल्यामुळे या निष्पाप मुलांच्या नशिबी आलेल्या या भयानक वास्तवाने संपूर्ण परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.