“फक्त खरातच का? स्वेच्छेने जाणाऱ्या महिलांवरही गुन्हे दाखल करा! ज्येष्ठ साहित्यिकेची मुख्यमंत्र्यांकडे थेट मागणी

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने राज्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे. खरातकडे अनेक उच्चशिक्षित महिला देखील स्वेच्छेने त्याच्या आमिषाला बळी पडल्याचे व्हिडिओंमधून स्पष्ट होत आहे.अशा महिलांवरही कायद्याने कठोर कारवाई व्हायला हवी,” अशी आक्रमक भूमिका ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अरुणा सबाने यांनी घेतली आहे.

डॉ. अरुणा सबाने यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली मागणी मांडली आहे. व्हायरल व्हिडिओंमध्ये अनेक उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित महिला खरातसोबत स्वेच्छेने वावरताना दिसत आहेत. समाजाला दिशा देणाऱ्या स्त्रियाच जर अशा भोंदूगिरीला खतपाणी घालत असतील, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत.

या कारवाईची सुरुवात महिला आयोगाच्या माजी अध्यक्षांपासून आणि प्रकरणातील उच्चशिक्षित महिलांपासून व्हायला हवी. भोंदूगिरीला थारा देणाऱ्या अशा महिलांमुळे समाजातील इतर निष्पाप स्त्रियांची फसवणूक होण्यास मदत होते, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

अरुणा सबाने यांनी पत्रात काय लिहिलं?

भोंदूबाबा खरात ने जो पराक्रम गाजवला तो आता बऱ्यापैकी जगासमोर आलेला आहे. अद्यापही जगासमोर न आलेला इतिहास नक्कीच खूप मोठा असेल. तो पोलिसांच्या कस्टडीत आहे. त्याचा कसून तपास सुरू आहे, अशा बातम्या आपण वाचल्या. त्याच्या नादी लागलेल्या स्त्रिया फार मोठ्या प्रमाणात आहेत. त्या सुशिक्षित, श्रीमंत वर्गातल्या, राजकारणातल्या, प्रशासनातल्या, गर्भ श्रीमंत पुरुषांच्या बायका अशा सगळ्या कॅटेगरीतल्या आहेत. अनेक पुरुष त्याच्या ध्यानी लागलेले आहेत. यांना कोणी गळ घालून तिथे नेले किंवा यांच्यावर कोणी बळजबरी केली अशा अवस्थेत त्या कोणत्याच व्हिडिओमध्ये किंवा फोटोमध्ये दिसत नाहीत. याचा अर्थ या स्त्रिया स्वेच्छेने खरातपर्यंत पोचल्या. किंवा खरातने त्यांना भुरळ पाडली आणि त्या तिथपर्यंत पोहोचल्या. सुशिक्षित स्त्रिया सुद्धा या अशा कर्मकांडाला कशा काय भुलू शकतात हे आजच्या तांत्रिक युगामधलं फार मोठं आश्चर्य आहे. मंत्र, जप याच्यापलीकडे जाऊन त्याचे मूत्र पिऊन त्यांच्या आयुष्यात काही बदल घडतो असं या स्त्रियांना वाटणं हे जगातलं नववं आश्चर्य आहे. मुल हे केवळ स्त्री आणि पुरुष संबंधातूनच निर्माण होऊ शकतं .कुठल्याही आशीर्वादातून, राखेतून, गंडे, धागेदोरे यातून होऊच शकत नाही इतकी साधी अक्कल या शिकलेल्या बायांना अजूनही का येत नाही याचे आश्चर्य वाटते. आणि भोंदू बाबा तुमच्याशी शरीर संबंध ठेवून तुम्हाला मूल देऊ इच्छित असेल तर हा प्रसाद नसून सरळ सरळ बलात्कार आहे हे या स्त्रियांच्या का लक्षात येत नाही?

योनीपूजा किंवा योनीला शूचिर्भूत करणे वगैरे हाही एक प्रकार वाचला. स्त्रीची योनी (Vagina) कुणीही शुद्ध वगैरे करू शकत नाही. तिला शुद्ध, स्वच्छ करणे ही आपली स्वतःची जबाबदारी आहे. योनी शुद्धीकरण ही वैज्ञानिक नव्हे, धार्मिक संकल्पना आहे, हे माहिती नसण्याइतपत स्त्रिया मूर्ख असतील तर यांनाही कडक शिक्षा झालीच पाहिजे.