
वसई-विरार परिसरात सायबर गुन्हेगारांचे जाळे दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे. आतापर्यंत केवळ सर्वसामान्यांना गंडा घालणारे हे सायबर चोर आता थेट राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील बड्या व्यक्तींना लक्ष्य करू लागले आहेत. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा आणि एका नामांकित शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी अनिल गुरव यांचा मोबाईल हॅक झाल्याची एक अत्यंत धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. लग्नसराईच्या दिवसांचा गैरफायदा घेऊन सायबर चोरांनी हा नवा सापळा रचला आहे.

…आणि अचानक व्हॉट्सॲप लॉगआऊट झाले!

मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी गुरव या नेहमीप्रमाणे आपल्या मोबाईलवर व्हॉट्सॲपवरील मेसेज पाहत होत्या. त्याच वेळी अचानक त्यांचे व्हॉट्सॲप खाते लॉगआऊट झाले. काहीतरी गडबड झाल्याचे त्यांच्या लक्षात येईपर्यंत सायबर चोरांनी आपला गेम केला होता. हॅकर्सनी त्यांच्या मोबाईलमधील डेटा चोरून थेट त्यांच्याच नंबरवरून तब्बल ३,००० ते ३,५०० संपर्कांना लग्नपत्रिकेच्या नावाखाली संशयास्पद मेसेज पाठवून दिले.
बड्या अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ
अश्विनी गुरव या केवळ राजकीय नेत्या नसून मुख्याध्यापिका देखील आहेत. त्यामुळे त्यांच्या मोबाईल संपर्क यादीत (Contact List) तहसीलदार, पोलीस अधिकारी, शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी, नामवंत शिक्षक आणि समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश आहे. या सर्व बड्या व्यक्तींना हे हॅकिंगचे मेसेज गेल्यामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
अज्ञात फाईल्स डाउनलोड करू नका: पोलिसांचे आवाहन
या गंभीर प्रकारानंतर अश्विनी गुरव यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला आहे. माणिकपूर पोलीस ठाणे आणि सायबर गुन्हे शाखेत या संदर्भात रीतसर तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना कडक इशारा दिला आहे. व्हॉट्सॲप किंवा कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आलेल्या अज्ञात फाईल्स, विशेषतः ज्यांच्या शेवटी ‘.APK’ लिहिलेले असते, त्या कधीही डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू नका. यामुळे तुमच्या बँक खात्याची माहिती आणि वैयक्तिक डेटा चोरीला जाऊ शकतो, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नेमका काय आहे हा ‘वेडिंग कार्ड’ सायबर स्कॅम?
सध्या लग्नघाईचे दिवस असल्याने सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीची एक नवी आणि भावनिक युक्ती शोधून काढली आहे. हे चोरटे नागरिकांच्या व्हॉट्सॲपवर “Invitation Card.apk” किंवा अशाच नावाची एक फाईल पाठवतात. त्यासोबत “आमच्या घरी लग्न आहे, पत्रिका पाहा आणि नक्की या,” असा आपुलकीचा संदेश लिहिला असतो.
अनेक नागरिक ही खरोखरच कोणा परिचिताच्या घरची लग्नपत्रिका आहे असे समजून ती फाईल डाउनलोड करतात. मात्र, ही कोणतीही इमेज किंवा पीडीएफ (PDF) फाईल नसून एक घातक ‘मालवेअर’ असलेली APK फाईल असते. ही फाईल मोबाईलमध्ये इन्स्टॉल होताच चोरांना तुमच्या फोनचा पूर्ण ताबा मिळतो आणि बँक खात्यासह सर्व वैयक्तिक माहिती हॅकर्सच्या हातात जाते. त्यामुळे अशा मेसेजपासून सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे.










