‘वेट अँड वॉच!’ ५० आमदार कमळ हाती घेणार; संजय राऊतांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील २५-३० आमदार आणि शिंदेसेनेतील २५ आमदार असे सुमारे ५० च्या आसपास आमदार भाजपात प्रवेश करतील. भविष्यात या घडामोडी घडताना दिसतील.

वेट अँड वॉच, असा मोठा दावा उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचे म्हटले जात आहे. पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी सदर दावा केला.

वारंवार हेच सांगतो की, राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे. सुनेत्रा पवार त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे अजितदादांचे सहकारी आहेत. नवीन रचनेत सुनेत्रा पवारांचे ते सहकारी असतील असे नाही. त्यांच्या पक्षातील अंतर्गत बाबीत दुसऱ्या पक्षाने का बोलावे हा माझा कायम प्रश्न आहे. त्यांनी काय पत्र लिहिले, कोणती पद दिले हा त्यांचा विषय आहे. पण भविष्यामध्ये या पक्षातील २५-३० आमदारांसह हा पक्ष भाजपामध्ये विलीन होईल. त्याचे नेतृत्व कुणाकडे असेल हे आताच सांगत नाही, असे संजय राऊत म्हणाले.

पुढील काही काळात शिंदेसेनेतील २५ आमदार हे भाजपामध्ये जातील. हे आमदार भाजपामध्ये विलीन होण्याच्या मानसिकतेत आहेत. फक्त त्यांना काही काळ वेट अँड वॉच असे सांगण्यात आले आहे. सुनेत्रा पवारांचा पक्ष आणि एकनाथ शिंदेचा पक्ष यांना विलीन व्हावे लागेल, असे राऊतांनी म्हटले आहे.

दरम्यान, पक्ष आणि निशाणी यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी पुन्हा पुढे केली आहे. यावरही संजय राऊतांनी टीका केली. तसेच निवडणूक आयोगावरही निशाणा साधला.