कर्जातून सुटण्यासाठी दुसऱ्याचा बळी! ; जालन्यात स्वतःलाच मृत घोषित करण्याचा आरोपीचा भयानक कट

जालना जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. ३१ मे २०२६ रोजी झालेल्या एका कार अपघाताचा तपास करताना जालना पोलिसांनी एका मोठ्या आणि क्रूर कटाचा पर्दाफाश केला आहे. सुरुवातीला निव्वळ अपघात वाटणारी ही घटना प्रत्यक्षात एक नियोजनबद्ध हत्या (Murder) असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. विम्याची मोठी रक्कम लाटण्यासाठी आणि कर्जाच्या विळख्यातून सुटका करून घेण्यासाठी एका व्यक्तीने स्वतःच्याच मृत्यूचा भयानक बनाव रचल्याची माहिती समोर आली आहे.

अपघाताची नोंद पण पोलिसांना संशय

३१ मे रोजी जाफ्राबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कारचा भीषण अपघात झाला होता. अपघातानंतर कारला अचानक आग लागली आणि या आगीत कारमधील एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला. सुरुवातीला हा निव्वळ अपघात वाटत असल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, घटनेतील काही संशयास्पद बाबींमुळे जालना पोलिसांनी तांत्रिक आणि कौशल्यपूर्ण तपास सुरू केला आणि त्यातून जे सत्य समोर आलं, त्याने पोलिसांचेही डोके चक्रावून गेले.

विम्याच्या रक्कमेसाठी निष्पापाचा बळी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार नितीन प्रभाकर गवळी हा आहे. नितीनवर प्रचंड कर्ज झाले होते. या कर्जाच्या विळख्यातून सुटण्यासाठी आणि विम्याची मोठी रक्कम हडपण्यासाठी त्याने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचण्याचे ठरवले.या भयानक कटासाठी त्याने अमित राजू फुलारे आणि आकाश गवळी या दोघांना आपल्यासोबत घेतले. या तिघांनी मिळून नाशिक येथील संदीप चौहाण नावाच्या तरुणाची गळा दाबून निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर संदीपचा मृतदेह कारमध्ये ठेवण्यात आला आणि कारसह तो मृतदेह जाळून खाक करण्यात आला. जेणेकरून जळालेला मृतदेह हा नितीन गवळीचाच आहे, असा सगळ्यांचा समज व्हावा आणि नितीनला विम्याचे पैसे मिळावे, असा हा क्रूर प्लॅन होता.

पोलिसांची कारवाई आणि गुन्हा दाखल

जाफ्राबाद पोलिसांनी या गुंतागुंतीच्या आणि आव्हानात्मक प्रकरणाचा छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम १०३ (१),कलम ६२ (२) (अ), कलम २३८ (अ) (ब), कलम ३ (५) कलमांन्वये गंभीर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली आहे. मात्र, मुख्य सूत्रधार नितीन प्रभाकर गवळी हा अजूनही फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक विशेष पथक रवाना करण्यात आले आहे. तसेच, जळालेला मृतदेह नेमका संदीप चौहाणचाच आहे का, हे कायदेशीररित्या सिद्ध करण्यासाठी ‘डीएनए’ तपासणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.जालना पोलिसांच्या या कामगिरीमुळे एका अत्यंत चाणाक्ष गुन्हेगाराचा पर्दाफाश झाला असून या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.