
एका बाजूला पत्नी बेपत्ता झाल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि दुसऱ्या बाजूला तिचाच काटा काढला… पंढरपूर पोलिसांनी एका चतुर गुन्हेगाराचा ‘डिजिटल’ सापळा रचून पर्दाफाश केला आहे. पत्नीच्या सोशल मीडिया चॅटिंग आणि संशयास्पद वर्तणुकीला कंटाळून पतीनेच तिची हत्या केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

पंढरपुरात एकाच दिवशी दोन घटनांची नोंद झाली होती. शहरातून एक महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी शहर पोलीस ठाण्यात दिली होती. त्याच सुमारास ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि वर्णनावरून खात्री केली असता, बेपत्ता झालेली महिला आणि मृत आढळलेली महिला एकच असल्याचं तपासात स्पष्ट झालं. मात्र, या मृत्यूचं गूढ अधिकच वाढलं होतं.

महिलेचा मृत्यू नैसर्गिक नसून तिची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना होता. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण सुरू केलं. यामध्ये महिलेचे इन्स्टाग्राम, फेसबूक आणि व्हाट्सअप स्टेटस तपासण्यात आले. मोबाईल ॲक्टिव्हिटी आणि स्टेटस अपडेट्सच्या वेळेवरून पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. मोबाईलच्या लोकेशन आणि स्टेटस अपलोड करण्याच्या पद्धतीवरून पतीच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्या.
संशयाची सुई पतीकडे वळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या पतीने पोलिसी खाक्या दाखवताच पोपटासारखे बोलू लागला. आपली पत्नी सतत सोशल मीडियावर चॅटिंग करत असते आणि तिचे कोणाशी तरी अनैतिक संबंध आहेत. ती प्रियकराच्या मदतीने आपली हत्या करेल, असा संशय त्याला होता. तसेच आरोपीची पत्नी अनेकदा घर सोडून निघून गेली. दोन-तीन दिवस गायब राहिल्यानंतर पुन्हा घरी यायची, त्यामुळे ती प्रियकराला भेटायला जात असावी, असा संशयही आरोपीला होता. याच रागातून पत्नीची हत्या केल्याची कबुली आरोपीनं दिली.
पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. १२ मार्च २०२६ रोजी झालेल्या या गुन्ह्याचा पोलिसांनी छडा लावल्याने पंढरपूर पोलिसांचं कौतुक केलं जात आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. या गुन्ह्यात त्याला कुणी मदत केली का? याचाही शोध घेतला जात आहे.










