भारतात फिरण्याच्या बहाण्याने करत होते धर्मप्रचार

गेल्या काही दिवसांमध्ये नाशिकमधील धर्मांतर प्रकरणावरून मोठ्या चर्चा सुरू असतानाच आता, पुण्यात देखील अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. टुरिस्ट व्हीजावर भारतात आलेले तीन अमेरिकन नागरिक ख्रिश्चन धर्माचा प्रचार करताना आढळून आल्यानंतर त्यांना १० मे च्या आत देश सोडून देण्याचे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत.

५३, ६५ आणि ६६ वर्षे वयोगटातील ३ अमेरिकन नागरिक टुरीस्ट व्हीजा मिळवून काही दिवसांपूर्वी भारतात आले होते. पिंपरी चिंचवड मधील एका हॉटेलमध्ये त्यांनी २६ एप्रिलला मुक्काम केला. २७ तारखेला ते पुण्यातील शुक्रवार पेठेत आले. त्यावेळी त्यांच्याकडे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत छापण्यात आलेली पत्रके होती.

शुक्रवार पेठेतील एका ड्रायव्हरला त्यांनी त्यातील एक पत्रक देऊन ख्रिश्चन धर्म इतर धर्मांपेक्षा कसा चांगला आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्या ड्रायव्हरने तिथे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर त्या तीन अमेरिकन नागरिकांना ताब्यात घेऊन त्यांना विशेष शाखेत नेण्यात आले.

चौकशी केली असता ते धर्मप्रसार करण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले. टुरिस्ट व्हीजावर भारतात आलेल्या परदेशी नागरिकांना धर्मप्रसार करण्यासाठी कायद्याने मनाई आहे. तरीही ते तिन अमेरिकन नागरिक धर्मप्रसार करत असल्याचे समोर आलं आहे. याआधी देखील हे तीन अमेरिकन नागरिक कधी टुरिस्ट तर कधी बीझनेस व्हीजावर भारतात आल्याचं त्यांच्या पासपोर्ट वरुन दिसून आलं आहे.

पर्यटक व्हिसावर भारतात येऊन ख्रिश्चन धर्माचा प्रसार आणि प्रचार केल्याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी तीन अमेरिकन नागरिकांना ‘लीव्ह इंडिया’ (भारत सोडा) नोटीस बजावली आहे. व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या तिघांनाही १० मे २०२६ पर्यंत किंवा त्यापूर्वी भारत सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.