
कारेगाव (ता.शिरुर) येथील एका युवकाने आमच्या गावात पाणी विकायचे नाही म्हणत, चालकाला शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली. इतकेच नाहीतर या तरुणाची थेट पिण्याच्या पाण्याच्या वाहतुकीची गाडी पेटवूनदिल्याची धक्कादायक घटना समोर आली. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे तेजस अनिल शितोळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारेगाव (ता.शिरुर) येथे राहुल पाचंगे यांच्या पाण्याच्या वाहनावरील चालक अंकुश पवार पिण्याचे पाणी विक्रीसाठी आलेला असताना तेजस शितोळे याने सदर चालकाला अडवून ‘तू कारेगावमध्ये पाणी विक्री करायचे नाही. असे मी कारेगावचा भाई आहे’, असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करत हाताने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, मी काय आहे हे दाखवून देतो, असे म्हणून थेट अंकुश पवार याच्या ताब्यातील एमएच १२ एसएच २३०६ ही पाण्याची गाडी पेटवून दिली.

दरम्यान, या घडलेल्या प्रकाराबाबत राहुल विठ्ठल पाचंगे (वय ४२, रा. ढोकसांगवी ता. शिरुर जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी तेजस अनिल शितोळे (रा. कारेगाव ता. शिरुर जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हवालदार गणेश आगलावे हे करत आहे.










