सोबत दारू प्यायले, वाद झाला अन्…; सांगलीत भरदुपारी मित्रानेच केला मित्राचा खून

In the modern criminal justice system, there are two types of homicide: murder and manslaughter.

सांगली जिल्ह्यातील कवठेपिरान येथे दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून एका ३५ वर्षीय तरुणाचा त्याच्याच मित्राने डोक्यात शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली. सचिन सुभाष पाटील (वय ३५) असे मृत तरुणाचे नाव आहे. खुनानंतर घराला कुलूप लावून पळून गेलेल्या संशयित आरोपीला सांगली ग्रामीण पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातून अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले आहे.

नेमके काय घडले?

कवठेपिरान येथील जगन्नाथ विलास भोसले (वय ४०) याला दारूचे प्रचंड व्यसन आहे. त्याच्या याच व्यसनाला कंटाळून पत्नी त्याला सोडून गेली आहे, तर आई-वडीलही शेतातील घरात वेगळे राहतात. जगन्नाथ घरात एकटाच राहत होता. मृत सचिन पाटील हा जगन्नाथचा मित्र असून तो अविवाहित होता. दोघेही मजुरीचे काम करायचे.

बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास सचिन हा जगन्नाथच्या घरी आला होता. घरात कोणीच नसल्याची संधी साधून दोघांनी एकत्र दारू पिण्याचा बेत आखला. मात्र, दारूची नशा चढल्यानंतर दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या जगन्नाथने घरात असलेल्या शस्त्राने सचिनच्या डोक्यात थेट वार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सचिनचा अतिरक्तस्त्रावामुळे जागीच तडफडून मृत्यू झाला.

घराला कुलूप लावून आरोपीचे पलायन

सचिनचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच जगन्नाथने पुरावा लपवण्यासाठी आणि पोलिसांपासून वाचण्यासाठी घराला बाहेरून कुलूप लावले आणि तो गावातून पसार झाला. दुपारी ४ च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. स्थानिक पोलीस पाटलांनी तातडीने सांगली ग्रामीण पोलिसांना याची माहिती दिली.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी गर्दी पांगवून घराचे कुलूप तोडले असता, आतमध्ये सचिन पाटील हा रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडलेला आढळून आला.

दुचाकी चोरून कोल्हापुरात पळाला; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

गुन्हा केल्यानंतर जगन्नाथने गावातीलच एकाची दुचाकी चोरली आणि दुधगावमार्गे अंबप (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथे पळ काढला. सांगली ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जगन्नाथ हा कोल्हापूर जिल्ह्यात असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने तिथे छापा टाकून सायंकाळी त्याला ताब्यात घेतले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट

घटनेची गांभीर्य ओळखून सांगली शहर विभागाचे उपअधीक्षक संदीप भागवत, सांगली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर आणि सहाय्यक निरीक्षक कल्याणी शिंदे यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. तसेच फॉरेन्सिक (न्यायालयीन वैज्ञानिक) पथकानेही घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत.

तपास सुरू

पोलिसांनी आरोपी जगन्नाथ भोसले याला अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. दारूच्या नशेत नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला आणि त्याने हा खून का केला, याचा अधिकृत खुलासा पोलीस तपासात लवकरच होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे कवठेपिरान परिसरात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.