मीरा-भाईंदरचा तो तरुण ‘झोंबी’ नव्हता! व्हायरल व्हिडिओमागचं सत्य आलं समोर

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मीरा-भाईंदरमधील एक व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल होत होता. रात्रीच्या वेळी एक तरुण रस्त्यावर ‘झोंबी’सारख्या विचित्र अवस्थेत उभा असल्याचे या व्हिडिओत दिसत होते. हा तरुण “झोंबी ड्रग्ज” च्या आहारी गेल्याचा दावा केला जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, काशिमीरा गुन्हे प्रकटीकरण शाखेने या व्हिडिओमागचे ‘गौडबंगाल’ उघड केले आहे.

नेमका काय होता तो व्हिडिओ?

व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण भाईंदरच्या ९० फूट रोडवर मध्यरात्रीच्या सुमारास शरीराची विचित्र हालचाल करत एकाच जागी थिजल्यासारखा उभा होता. नेटिझन्सनी हा ‘झोंबी ड्रग’चा परिणाम असल्याचे सांगत व्हिडिओ शेअर केला, ज्यामुळे शहरात ड्रग्ज रॅकेट सक्रिय झाल्याची चर्चा सुरू झाली होती.

पोलिसी तपासात ‘झोंबी’चं कनेक्शन नेपाळशी!

घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-१ च्या पथकाने तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली. तपासात हा तरुण समीर रावल असल्याची ओळख पटली. समीर हा मूळचा नेपाळचा असून तो मार्च २०२६ मध्ये कामाच्या शोधात मीरा-भाईंदरमध्ये आला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता धक्कादायक माहिती समोर आली.

‘झोंबी ड्रग’ नाही, तर औषधांचा ओव्हरडोज!

समीरला मागील दोन वर्षांपासून ‘प्रेगाबालीन’ या गोळ्यांचे व्यसन आहे. या गोळ्या प्रामुख्याने मज्जासंस्थेच्या वेदनांवर उपचारासाठी वापरल्या जातात. १३ एप्रिलच्या रात्री समीरने एकाच वेळी या औषधाच्या ५ गोळ्या घेतल्या होत्या. औषधाच्या अतिसेवनामुळे त्याला तीव्र चक्कर आली आणि त्याचे शरीर एका जागी ताठ झाले. नेमका त्याच वेळी कोणीतरी व्हिडिओ काढून तो चुकीच्या माहितीसह व्हायरल केला.

विना प्रिस्क्रिप्शन औषध विकणाऱ्या मेडिकलवर कारवाई

या तपासात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. समीरने ही ‘शेड्यूल-एच’ प्रकारातील औषधे भाईंदरमधील नवघर नाका परिसरातील एका मेडिकलमधून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खरेदी केली होती. पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाला याबाबत कळवले असून संबंधित मेडिकल दुकानदारावर कडक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका!

मीरा-भाईंदरमध्ये कोणतेही ‘झोंबी ड्रग’ आलेले नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. “केवळ औषधांच्या चुकीच्या वापरामुळे ही स्थिती ओढवली होती. नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवांना बळी पडू नये,” असे आवाहन पोलिसांनी केले आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या या कारवाईमुळे अखेर या ‘झोंबी’ प्रकरणावर पडदा पडला आहे.