३ बालकांची साक्ष ठरणार फाशीचा फास! नसरापूर चिमुकली हत्या प्रकरणात कोर्टात काय घडले?

पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे ६५ वर्षीय नराधमाने एका चिमुकलीवर केलेल्या अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरणाच्या सुनावणीत आता एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या खटल्यातील मुख्य आरोपीवर न्यायालयात दोष निश्चिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सुनावणी दरम्यान तीन लहान मुलांनी कोणत्याही भीतीशिवाय कोर्टात अत्यंत निर्भीडपणे प्रत्यक्षदर्शी म्हणून साक्ष दिली आहे. या लहान मुलांच्या साक्षीमुळेच नसरापूरच्या या नराधमाला फाशीच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवणे शक्य होणार असल्याचे बोलले जात आहे.

पत्राच्या शेडमधील ‘तो’ थरार मुलांनी कोर्टात सांगितला

घटनेच्या दिवशी तीन लहान मुले त्याच परिसरात खेळत होती. ६५ वर्षांचा नराधम आरोपी पीडित चिमुकलीला गोठ्याशेजारच्या पत्र्याच्या शेडमध्ये जबरदस्तीने घेऊन जात असताना या मुलांनी पाहिले होते. मुलांनी गोठ्याच्या फटीतून पाहिले असता त्यांना आरोपी संशयास्पद स्थितीत दिसला. आपल्याला कोणीतरी पाहत असल्याचा सुगावा लागताच नराधम आरोपीने त्या लहान मुलांवर दगडफेक देखील केली होती. दगड लागल्यामुळे मुले तेथून पळून गेली, मात्र त्यांनी हा संपूर्ण थरारक घटनाक्रम आणि नराधमाचा चेहरा आपल्या मनात पक्का करून ठेवला होता.

ओळख परेड आणि व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नराधमाला ओळखले!

विशेष सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, हा खटला तडीस नेण्यासाठी मुलांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.येरवडा कारागृहात झालेल्या ओळख परेडदरम्यान आणि न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर असलेल्या आरोपीला या तिन्ही बालकांनी स्पष्टपणे ओळखले आहे. कोर्टात त्यांनी कोणतीही भीती न बाळगता प्रत्यक्षदर्शी म्हणून दिलेली साक्ष या खटल्यात आरोपीला कठोरतम् म्हणजेच फाशीची शिक्षा देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या प्रकरणात एकूण ८२ साक्षीदारांपैकी १६ प्रमुख साक्षीदारांची साक्ष आतापर्यंत नोंदवून झाली आहे.

नसरापूरला हादरवणारी ‘ती’ काळी घटना काय होती?

१ मे रोजी नसरापूर येथे ६५ वर्षांच्या एका वृद्ध नराधमाने घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीला गोठ्यात नेऊन तिच्यावर पाशवी लैंगिक अत्याचार केला होता. आपले पाप उघडकीस येऊ नये म्हणून त्याने चिमुकलीला दगडाने ठेचून निर्घृणपणे मारले आणि तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला होता. या धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. मात्र, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि आता या तीन धाडसी मुलांच्या साक्षीमुळे नराधमाचे पाप कोर्टासमोर पूर्णपणे उघडे पडले आहे.