
पुणे जिल्ह्यातून नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि क्रूर दुहेरी हत्येची घटना समोर आली आहे. जुन्नर तालुक्यातील एका नराधम मुलाने कौटुंबिक वादातून आपल्या वृद्ध वडिलांसह सख्ख्या भावाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली आहे. या भयानक हत्याकांडामुळे संपूर्ण जुन्नर परिसर आणि आदिवासी पट्टा हादरून गेला आहे. ही घटना जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागातील पारगाव तर्फे मढ गावातील बगाडवाडी परिसरात घडली आहे.जयराम महादू मुकणे (वय ६५) आणि राजू जयराम मुकणे (वय ३०) अशी हत्या झालेल्या दुर्दैवी बाप-लेकाची नावे आहेत. तर बाबाजी मुकणे असे हत्या करणाऱ्या नराधम आरोपीचे नाव आहे.

…आणि आरोपी रात्रभर मृतदेहांच्या शेजारीच झोपला!

या घटनेतील सर्वात अंगावर काटा आणणारी बाब म्हणजे, आरोपी बाबाजी मुकणे याने रात्रीच्या सुमारास वडील आणि भावाची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. या अमानुष कृत्यानंतर त्याला कोणताही पश्चात्ताप झाला नाही. तो रात्रभर त्या दोन्ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहांच्या शेजारीच शांतपणे झोपून राहिला होता.
सकाळी शेळ्या चारणाऱ्यांनी पाहिले मृतदेह
हा धक्कादायक प्रकार सकाळी उघडकीस आला. नेहमीप्रमाणे गावातील काही स्थानिक नागरिक सकाळी सदाबाजार आणि परिसरातील डोंगराळ भागात शेळ्या चारण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना जयराम आणि राजू हे दोघे रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडलेले दिसले. हा थरार पाहून नागरिकांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती ओतूर पोलिसांना दिली.
ओतूर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (Post-mortem) जवळच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत. पोलिसांनी तात्परता दाखवत आरोपी बाबाजी मुकणे याला घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले आहे.
हत्येचे नेमके कारण काय?
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक तपासातून ही घटना केवळ कौटुंबिक वादातून घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, आरोपीने एवढे टोकाचे पाऊल का उचलले? घरगुती वादाचे नेमके स्वरूप काय होते? याचा सखोल तपास ओतूर पोलीस करत आहेत. या दुहेरी हत्याकांडामुळे पारगाव आणि बगाडवाडी परिसरात सध्या तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.










