SIT चा चक्रव्यूह आणि खरातच्या पुत्राचे आढेवेढे! प्रश्नांची सरबत्ती झाली, पण एकाच उत्तराने तपास अधिकारीही चक्रावले!

भोंदू बाबा अशोक खरात याच्या काळ्या साम्राज्याचा पर्दाफाश करण्यासाठी विशेष तपास पथक अहोरात्र प्रयत्न करत आहे. शिर्डीतील जमीन फसवणूक प्रकरणात अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला ताब्यात घेण्यासाठी एसआयटीचे पथक गेले असता ती पथकाला सापडली नाही.

यावेळी खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात याला एसआयटीने चौकशीसाठी ताब्यात घेतले. SIT ने त्याची कसून चौकशी केली. मात्र, या चौकशी दरम्यान हर्षवर्धनने बहुतांश प्रश्नांना “सर्व काही डॅडलाच माहिती आहे” असे उत्तर देत माहिती देण्याचे टाळले. असे असले तरी, घरामध्ये मोठ्या प्रमाणात ‘कॅश’ येत असल्याची महत्त्वपूर्ण कबुली त्याने दिल्याने खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

SIT ने हर्षवर्धनवर प्रश्नांची सरबत्ती केली असता, त्याने एक धक्कादायक माहिती दिली. “घरामध्ये रोख रक्कम मोठ्या प्रमाणात येत होती,” असे त्याने पोलिसांना सांगितले. हर्षवर्धनच्या या कबुलीमुळे अशोक खरात केवळ जमीन फसवणूक आणि सावकारीच नाही, तर ‘हवाला रॅकेट’ देखील चालवत असावा, असा संशय आता पोलिसांना आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घरात कोठून येत होती? आणि ती कोणाला दिली जात होती? याचा तपास सुरु आहे. तर इतर गोष्टीत खरातच्या मुलाने पोलिसांना माहिती दिली नाही. ‘सर्व डॅडला माहिती’, असे सांगत त्याने माहिती देण्यास नकार देत आढेवेढे घेतल्याची माहिती मिळत आहे.