दैवी शक्तीचा बनाव आणि रुद्राक्षाचा धाक; खरातनंतर महेशगिरीच्या ‘भयानक’ कांडाने महाराष्ट्र हादरला!

नाशिक जिल्ह्यात भोंदूगिरीच्या घटनांनी सीमा ओलांडली असून, कॅप्टन अशोक खरात प्रकरण ताजे असतानाच निफाड तालुक्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. कौटुंबिक समस्या दूर करण्याचे आणि भूतबाधा उतरवण्याचे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार करणाऱ्या महेशगिरी महाराज उर्फ महेश दिलीप काकडे याच्यावर लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

पीडित महिला कौटुंबिक ताणतणाव आणि मुलीच्या लग्नातील अडथळ्यांमुळे मानसिक त्रासात होती. याच त्रासातून मार्ग काढण्यासाठी तिचे कुटुंब धरणगाव येथील महेशगिरी याच्या ‘प्रति गाणगापूर’ मठात गेले होते. यावेळी या भोंदू बाबाने महिलेला “बाहेरची बाधा” असल्याचे सांगून तिच्या मनात भीती निर्माण केली.

अंधश्रद्धेचा बाजार आणि विधीचा बनाव

भोंदू महेशगिरीने तथाकथित विधीच्या नावाखाली पीडितेला पापनाशक कुंडात अंघोळ करण्यास भाग पाडले आणि ओल्या वस्त्रानिशी उंबराच्या झाडाला फेऱ्या मारायला लावल्या. हा सर्व बनाव केवळ महिलेचा विश्वास संपादन करण्यासाठी आणि तिची फसवणूक करण्यासाठी रचला गेल्याचे आता समोर आले आहे.

लॉजवर नेऊन अत्याचार आणि धमकी

काही दिवसांनंतर महेशगिरीने पीडितेचा मोबाईल नंबर मिळवून तिला अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. “दैवी विधीसाठी एकांतात यावे लागेल” असे सांगून त्याने पीडितेला नाशिकमध्ये बोलावून घेतले. तिथून तिला नाशिक-त्र्यंबक रोडवरील एका लॉजवर नेले. “माझ्या गळ्यात रुद्राक्ष आहे, माझ्यात दैवी शक्ती आहे, माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही,” अशी धमकी देऊन त्याने पीडितेवर अत्याचार केला आणि तिचे आक्षेपार्ह फोटोही काढले.

‘अंनिस’च्या मदतीने पोलिसांत धाव

भोंदूच्या दहशतीमुळे पीडित महिला सुरुवातीला प्रचंड घाबरली होती. मात्र, तिने धीर एकवटून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. डॉ. टी. आर. गोराणे आणि कृष्णा चांदगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रकरण नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आले.

पोलिसांची कडक कारवाई

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या सूचनेनुसार लासलगाव पोलिसांनी महेशगिरी काकडे विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या अटकेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, अशा भोंदू बाबांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.