
छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जेवतांना भाजीत केस निघाला म्हणून निर्दयी पतीने आपल्या २५ वर्षीय पत्नीला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केल्याचे समोर आले आहे. त्यांनतर पती आणि सासरच्या छळाला कंटाळून महिलेने आत्महत्या केली. ईश्वरी बनकर (वय २५) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

अजय बनकर असे निर्दयी पतीचे नाव आहे. ईश्वरीचे वडील राजू भुजंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे लग्न २०२० मध्ये मोठ्या थाटामाटात लावून दिले होते. सासरच्यांना सोने-नाणे, २ लाख रुपये हुंडा आणि सर्व घरगुती साहित्य दिले होते. तरीही पती अजय हा वारंवार माहेरहून पैशांची मागणी करण्यासाठी तिला मारहाण करत असे. दारूच्या नशेत तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता.

विशेष म्हणजे अजय हा महापालिकेच्या घनकचरा विभागात प्रभारी जवान म्हणून कार्यरत आहे. ईश्वरीच्या आत्महत्यानंतर कुटुंबीयांनी घाटी रुग्णालयात ठिय्या धरला होता. दोषींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला. छावणी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पती अजय बनकर याच्यासह सासरच्या सात जणांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी संबंधित तरुणाविरोधात केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोक्सो कायद्याअंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.










