
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या पापाचा घडा आता अधिकच भरत चालला आहे. एसआयटी तपासात एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली असून, खरातने पीडित महिलांचे शोषण केल्यानंतर त्यांचे गर्भपात करण्यासाठी नाशिकमधील काही नामांकित डॉक्टरांची मदत घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामध्ये महापालिकेच्या एका डॉक्टराचाही समावेश असल्याचे समजते, ज्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

स्वतःला “दैवी शक्ती” असलेला पुरुष सांगून अशोक खरातने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढले होते. घरगुती आणि वैयक्तिक समस्या दूर करण्याच्या बहाण्याने त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले. या तपासादरम्यान एका पीडित महिलेच्या गर्भपाताचे प्रकरण समोर आले होते. गर्भपात नेमका कुठे आणि कोणाच्या मदतीने करण्यात आला, याचा तपास करताना पोलिसांच्या हाती मोठे धागेदोरे लागले आहेत.

तपासात असे समोर आले आहे की, खरातच्या संपर्कात नाशिकमधील काही बडे डॉक्टर आणि सोनोग्राफी सेंटर्स चालक होते. जेव्हा एखादी पीडित महिला गरोदर राहायची, तेव्हा खरात तिला गर्भपाताच्या गोळ्या द्यायचा. नियमबाह्य पद्धतीने या गोळ्या खरातपर्यंत कशा पोहोचल्या? याचा शोध घेतला असता, काही डॉक्टरांनी त्याला या गोळ्या पुरवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
नाशिक महानगरपालिकेतील एक डॉक्टर खरातच्या नियमित संपर्कात होता आणि त्याने या गैरकृत्यात मदत केल्याचा संशय आहे. काही खासगी सोनोग्राफी सेंटर्समध्ये पीडित महिलांची तपासणी करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का? याचीही चौकशी सुरू आहे. त्यामुळे आता अशोक खरात प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.










