भोंदू खरातचं बँक लॉकर उघडलं अन् ईडीचे अधिकारीही थक्क!

महिलांचं लैंगिक शोषण आणि खंडणीखोरीच्या आरोपाखाली अटकेत असलेला नाशिकचा वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने खरातच्या आर्थिक साम्राज्यावर सर्जिकल स्ट्राईक केला असून, त्याच्या बँक लॉकरमधून कुबेराचा खजिनाच बाहेर आला आहे. नाशिकच्या ‘विश्वास को-ऑपरेटिव्ह बँक’ येथील लॉकरची झडती घेतली असता, ईडीचे अधिकारीही मालमत्तेचा आकडा पाहून चक्रावले आहेत.

लॉकरमध्ये नेमकं काय सापडलं?
खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांच्या नावावर असलेल्या या लॉकरची झडती खरातच्या मुलीच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी खालील मुद्दे समोर आले आहेत:

सोनं: तब्बल १.१० कोटी रुपये किमतीचे सोन्याचे दागिने.

परदेशी चलन: ५५०० अमेरिकन डॉलर्स (भारतीय चलनात सुमारे ५.१९ लाख रुपये).

चांदी: १.८९ लाख रुपयांचे चांदीचे दागिने

९० मालमत्तांची कागदपत्रे अन् लक्झरी कार जप्त!

ईडीने यापूर्वीच खरातच्या नाशिक, पुणे आणि शिर्डी येथील ठिकाणांवर छापेमारी केली होती. या कारवाईत धक्कादायक माहिती समोर आली आहे. २.४ कोटी रुपयांचा बँक फंड फ्रीझ करण्यात आला आहे. ४२ लाख रुपयांची रोकड हस्तगत केली आहे. ९० मालमत्तांची कागदपत्रे जप्त केली असून त्यांची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे. गुन्ह्यातून मिळवलेल्या पैशातून घेतलेली आलिशान ‘मर्सिडीज-बेंझ’ कारही ईडीने ओढून नेली आहे.

कसा अडकला भोंदू खरात ईडीच्या जाळ्यात?

नाशिक पोलिसांनी मार्च महिन्यात खरात विरुद्ध एका बांधकाम व्यावसायिकाकडून ४ ते ५ कोटी रुपये उकळल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला होता. खरातने या व्यावसायिकाला धमकावून त्याची ९० लाखांची लक्झरी कारही स्वतःच्या नावावर करून घेतली होती. या खंडणीखोरीच्या (PMLA) गुन्ह्याचा आधार घेत ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा तपास सुरू केला आणि खरातच्या काळ्या साम्राज्याचा पर्दाफाश झाला.

भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांचं शोषण

केवळ आर्थिक गुन्हेच नाही, तर भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचे गंभीर आरोपही खरातवर आहेत. धर्माच्या नावाखाली लोकांची फसवणूक करून त्याने ही अफाट मालमत्ता जमवल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.सध्या अशोक खरात जेलमध्ये असून, ईडीच्या या कारवाईमुळे त्याच्या उरल्यासुरल्या समर्थकांचेही धाबे दणाणले आहेत. जप्त केलेल्या ९० मालमत्ता नक्की कोणाच्या नावे आहेत, याचा तपास आता ईडी करत आहे.