स्वारगेट बलात्कार प्रकरणातील नराधम दत्तात्रय गाडेविरोधात कोर्टात भक्कम पुरावे सादर

पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानक परिसरात झालेल्या अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक अत्याचार प्रकरणाच्या खटल्याला आता मोठी गती मिळाली आहे. स्वारगेट आगारातील शिवशाही बसमध्ये एका प्रवासी तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे याचा आता कोर्टात ‘गेम ओव्हर’ होण्याची वेळ आली आहे. या संवेदनशील प्रकरणात न्यायालयाने अखेर आरोपी दत्तात्रय गाडे याच्याविरोधात अधिकृतपणे आरोप निश्चित केले आहेत. सरकारी पक्षातर्फे न्यायालयात भक्कम पुरावे सादर करण्यात आले असून, पीडितेला लवकरच न्याय मिळण्याची चिन्हे आहेत.

विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्याकडून भक्कम पुरावे सादर

या अत्यंत संवेदनशील खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे प्रसिद्ध आणि विशेष सरकारी वकील अजय मिसर बाजू मांडत आहेत. त्यांनी आरोपी गाडे याला कठोर-अतिकठोर शिक्षा व्हावी यासाठी न्यायालयासमोर पुराव्यांची मोठी साखळी सादर केली आहे. सरकारी वकिलांनी या प्रकरणात आरोपीचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी तब्बल ८७ साक्षीदारांची यादी आणि आरोपीच्या गुन्हेगारी कृत्यांचा संपूर्ण ताळेबंद न्यायालयासमोर ठेवला आहे. आरोप निश्चिती झाल्यामुळे आता या खटल्याच्या सुनावणीला वेग येणार आहे.

पोलिसांचा वेगवान तपास: ५२ दिवसांत ८९२ पानांचे आरोपपत्र

२५ फेब्रुवारी २०२५ रोजी ही संतापजनक घटना घडली होती. गुन्हा घडल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अत्यंत तत्परतेने तपास चक्र फिरवली होती. पोलिसांनी अवघ्या ५२ दिवसांच्या विक्रमी वेळेत आरोपी दत्तात्रय गाडे याच्याविरोधात ८९२ पानांचे प्रचंड मोठे दोषारोपपत्र (Charge-sheet) न्यायालयात दाखल केले होते. या तपासादरम्यान पोलिसांनी ८२ साक्षीदारांकडे कसून चौकशी केली, तर ५ मुख्य साक्षीदारांचे जबाब थेट न्यायालयात नोंदवून घेतले होते. पोलिसांच्या या जलद आणि अचूक तपासामुळे सरकारी पक्षाची बाजू कोर्टात कमालीची भक्कम झाली आहे.

काय होतं संपूर्ण प्रकरण?

वर्षाभरापूर्वी २५ फेब्रुवारी २०२५ रोजी स्वारगेट एसटी बस स्थानकाच्या आवारात उभी असलेल्या एका ‘शिवशाही’ बसमध्ये हा भयानक प्रकार घडला होता. पहाटे ५:४५ ते ६:४५ च्या सुमारास एका प्रवासी तरुणी एकटी असल्याचा गैरफायदा घेत आरोपी दत्तात्रय गाडे याने बसमध्ये शिरून तिच्यावर दोन वेळा अत्याचार केला होता.हा घृणास्पद गुन्हा केल्यानंतर आरोपी गाडे पुण्यातून पसार झाला होता. तो शिरूर परिसरातील आपल्या गावातील शेतात लपून बसला होता. मात्र, पुणे पोलिसांनी कोणताही सुगावा लागू न देता तांत्रिक तपासाच्या आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे त्याचा माग काढला आणि त्याला शिरूरमधून बेड्या ठोकल्या होत्या. आता या प्रकरणात आरोप निश्चिती झाल्यामुळे आणि इतक्या मोठ्या संख्येने साक्षीदार-पुरावे समोर आल्यामुळे, नराधम दत्तात्रय गाडेला कायद्याचा हिसका मिळून फाशी किंवा जन्मठेपेसारखी कठोर शिक्षा होणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.