
पुण्यात क्रेडिट कार्ड वसुलीच्या नावाखाली एजंटांनी चक्क कायद्याची ऐशीतैशी करत एका नागरिकाला भररस्त्यात बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील पंधरा नंबर चौकात सोमवारी दुपारी हा प्रकार घडला. विशेष म्हणजे, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होऊनही हडपसर पोलिसांनी केवळ ‘अदखलपात्र’ गुन्हा दाखल केल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप जामदार असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. खासगी क्रेडिट कार्ड कंपनीचे तीन वसुली एजंट— जय कासार, विनीत कासार आणि तनिष खुडे — यांनी थकबाकी वसुलीसाठी जामदार यांना भर चौकात अडवले. वादाचे रूपांतर लवकरच शिवीगाळ आणि मारहाणीत झाले.
धक्कादायक! महिलेच्या विनवणीकडेही दुर्लक्ष
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, हे तिघे एजंट जामदार यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत असलेली एक महिला हात जोडून, “मारहाण करू नका” अशी कळकळीची विनंती करत होती. मात्र, या गुंडप्रवृत्तीच्या एजंटांना कशाचीही भीती उरली नव्हती. त्यांनी महिलेची पर्वा न करता मारहाण आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ सुरूच ठेवली.
वरिष्ठ अधिकारी दखल घेणार का?
भारतीय न्याय संहितेनुसार सार्वजनिक ठिकाणी मारहाण आणि धमकी देणे हा गंभीर गुन्हा असतानाही, पोलिसांनी ठोस कारवाई का टाळली? या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.










