
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही, एसटी स्थानकांचा पीपीपी तत्वावर विकास करणार

पुणे – एसटी महामंडळ आणि एसटी कामगारांचे मूलभूत प्रश्न मार्गी लागले पाहिजेत अशी राज्य शासनाची भूमिका असून राज्य शासन एसटी कामगारांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे महासचिव हनुमंत ताटे यांचा अमृतमहोत्सव सोहळा व त्यानिमित्त आयोजित कामगार परिषदेत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोरोना कालावधीत एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न होता. तेव्हा राज्य शासनाने पुढाकार घेऊन वेतनाची आवश्यक ती तरतूद केली होती. राज्य शासन एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणीच्या काळात मागे उभे राहते. सन 1948 पासून एसटीचा प्रवास सुरू झाला असून ‘गाव तेथे एसटी’ या ब्रीदवाक्यानुसार सर्वसामान्य माणसाला प्रवासाची सेवा देत आहे. सेवा देत असताना एसटी लोकाभिमुख झाली पाहिजे. प्रवाशांनाही परवडणाऱ्या दरात सेवा देणे आवश्यक असून त्याबाबत कामगारांनीही पुढाकार घेतला पाहिजे. राज्यातील शहरांचा विस्तार झाल्यामुळे एसटीच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागा शहराच्या मध्यवर्ती भागात आल्या आहेत. त्या ठिकाणी एसटी स्थानकांचा सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) विकास करण्यासाठी कराराचा कालावधी 30-30-30 वर्षे असा वाढविण्याचे धोरण अंमलात आहे. तथापि, कमी कालावधीमुळे विकासक पुढे येत नसल्याने आता यात बदल करुन आधी 49 व नंतर 49 वर्षे असा 98 वर्षापर्यंत करार वाढविण्याचे नवीन धोरण लवकरच राज्य शासन आणत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना चांगल्या मूलभूत सोयी सुविधा मिळतील, असेही ते म्हणाले. सर्वसामान्यांना सेवा पुरवित असलेल्या एसटी बसेस चांगल्या असल्या पाहिजेत ही शासनाची भूमिका आहे. डिझेल इंधनावरील खर्च वाचविण्यासाठी ईलेक्ट्रिक बसेसलाही (ईव्ही) प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात अनुदान देत असून राज्य शासनही प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी ताटे आणि त्यांच्या पत्नी यांचा उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ताटे यांनी सन्मानाला उत्तरपर भाषण दिले. कामगार नेते बाबा आढाव यांनीही मनोगत व्यक्त केले. संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.










