गतीमंद मुलगा बरा करण्याचे आमिष दाखवून साडेसहा लाख उकळले; पारनेरमधील भोंदू बाबा जेरबंद

गतिमंद मुलाचा आजार पूर्णपणे बरा करण्याचे आणि भावाचे लग्न जमवून देण्याचे खोटे आमिष दाखवून एका भोंदू बाबाने हतबल कुटुंबाची तब्बल साडेसहा लाख रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार पारनेरमध्ये उघडकीस आला आहे.

हा प्रकार केवळ आर्थिक फसवणुकीपुरता मर्यादित नसून, या नराधम भोंदू बाबाने मुलाला जिवंत मारण्याची धमकी देऊन पीडित महिलेवर वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचीही अत्यंत घृणास्पद घटना समोर आली आहे. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात मुख्य भोंदू बाबा, त्याचा मुलगा आणि एका महिला साथीदाराविरुद्ध विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कौटुंबिक अडचणींनी खचलेलं कुटुंब अंधश्रद्धेच्या जाळ्यात

मिळालेल्या माहितीनुसार, पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या ४० वर्षीय पीडित शेतकरी महिलेचा १७ वर्षांचा मुलगा मतिमंद आहे. अनेक ठिकाणी वैद्यकीय उपचार करूनही त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा होत नव्हती. त्यातच शेतीत चांगली पिके येऊनही घरातील कर्ज फिटत नव्हते आणि गरिबी हटत नव्हती. याच दरम्यान पीडितेच्या सख्ख्या भावाचे वय झाले तरी त्याचे लग्न जमत नव्हते.

अशा अनेक कौटुंबिक अडचणींनी खचलेल्या या महिलेला पारनेर तालुक्यातील रुई छत्रपती येथील राजू दिवटे, त्याचा मुलगा शशिकांत दिवटे आणि त्यांची महिला सहकारी शोभा तरटे हे देवऋषी (देवभगत) असून ते कोणत्याही संकटावर हमखास तोडगा काढतात, अशी अंधश्रद्धेतून खोटी माहिती मिळाली होती.

‘मांढरदेवीच्या काळुबाईची बाधा’ सांगून घातली भीती

पीडितेने वर्ष २०२० मधील कोरोना काळापासून या भोंदूबाबाकडे आपल्या समस्या घेऊन जाण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी पीडितेची हतबलता ओळखून संशयित भोंदूबाने, ‘तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मांढरदेवीच्या काळुबाईची मोठी बाधा आहे, ती घालवण्यासाठी घरात होमहवन आणि मोठी पूजा करावी लागेल,’ असे सांगून भीती घातली.

मुलाच्या तांत्रिक उपचारासाठी ३ ते ४ लाख रुपये आणि भावाच्या लग्नाचा तोडगा काढण्यासाठी दीड लाख रुपये खर्च येईल, असे सांगून त्यांनी पीडितेकडून मुलाचे आणि भावाचे फोटो जादुटोणा व तंत्र-मंत्र करण्यासाठी मागवून घेतले.

साडेसहा लाखांची लूट आणि शारीरिक छळ

सुरुवातीला पूजेच्या साहित्याच्या नावाखाली महिला सहकारी शोभा तरटे हिने १० हजार रुपये रोख घेतले. अशा प्रकारे वेळोवेळी भोंदू बाबाने कुटुंबाकडून ६ लाख ५० हजार रुपये उकळले. एवढे पैसे देऊन आणि होमहवन करूनही मुलाच्या प्रकृतीत काहीच फरक पडत नसल्याने आणि उलट छळ वाढत असल्याने महिलेला आपली मोठी आर्थिक व शारीरिक फसवणूक झाल्याचे समजले. या काळात भोंदू बाबाने मुलाला मारण्याची धमकी देऊन पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचारही केले.

मुख्य भोंदू बाबा पोलिसांच्या गजाआड

आपली फसवणूक आणि छळ झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने धीर धरून थेट पारनेर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करताच तातडीने चक्र फिरवून रात्री उशिरा मुख्य भोंदू बाबा राजू दिवटे याला अटक केली आहे. या प्रकरणी त्याचा मुलगा आणि महिला साथीदार यांच्यावरही गुन्हा दाखल असून, पोलीस या धक्कादायक प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.