वहिनीचे पाय बांधले आणि गळा चिरला

भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भागडी गावातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत क्रूर घटना समोर आली आहे. अवघ्या ३० वर्षीय विवाहित महिलेची तिच्याच नात्याने दीर लागणाऱ्या तरुणाने धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केली. विशेष म्हणजे, आईची हत्या होताना तिची चिमुरडी मुलगी हे सगळं पाहत होती. या घटनेने संपूर्ण जिल्हा सुन्न झाला आहे.

नेमकी घटना काय?

मयत महिला माधुरी तुळशीदास अंबादे आणि तिचा नात्याने दीर लागणारा आरोपी गौरव अंबादे हे रविवारी रात्री पालांदूर येथील एका लग्नावरून परत येत होते. सोबत माधुरीची लहान मुलगी जान्हवी देखील होती. रात्री बराच उशीर झाल्यामुळे त्यांनी घरी न जाता भागडी येथील नातेवाईक नाजुका युवराज गणवीर यांच्याकडे मुक्काम करण्याचा निर्णय घेतला.

रात्री सर्वजण शांत झोपलेले असताना पहाटे ३ वाजेच्या सुमारास क्रौर्याचा कळस गाठला गेला. आरोपी गौरवने माधुरीचे पाय स्कार्पने बांधले, उशीने तोंड दाबले आणि धारदार शस्त्राने तिचा गळा चिरून तिची जीवनयात्रा संपवली. आईची हत्या होत असताना लहानग्या जान्हवीचा रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज ऐकून घरमालक नाजुका गणवीर यांना जाग आली.

१२ तासांत आरोपीला बेड्या

नाजुका गणवीर यांनी बाहेर येऊन पाहिले असता, आरोपी गौरव अत्यंत घाईत आपल्या दुचाकीवरून पळ काढत होता. घरात जाऊन पाहिले तर माधुरी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. या घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि गुन्ह्यानंतर अवघ्या १२ तासांच्या आत आरोपी गौरव अंबादे याला ब्रह्मपुरी येथून अटक केली. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

मुलीसमोर आईचा अंत; परिसरात संताप

स्वतःच्या डोळ्यादेखत आईचा निर्घृण अंत झाल्याचे पाहून चिमुरडी जान्हवी पूर्णपणे हादरली आहे. एका नराधम दीराने आपल्याच वहिनीची इतक्या क्रूरपणे हत्या का केली? या प्रश्नाने सर्वत्र खळबळ उडाली असून परिसरात आरोपीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.