
पुण्यातील चंदननगर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. चारचाकी गाडी, फ्लॅट खरेदीसाठी पैशांची मागणी आणि सोन्याच्या अंगठीसाठी सासरच्या मंडळींनी केलेल्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून २५ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. तेजस्विनी गोरख सोनवणे असं आत्महत्या केलेल्या दुर्दैवी विवाहितेचं नाव आहे.

याप्रकरणी पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्यात मृत विवाहितेच्या पतीसह सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत तेजस्विनीचे वडील शामराव बाळासाहेब गवळी (वय ५२, रा. नवीन वांगदरी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती गोरख संभाजी सोनवणे (वय ३२), सासरा संभाजी लक्ष्मण सोनवणे (वय ६२) आणि सासू अलका संभाजी सोनवणे (वय ५५) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

‘पैसे असतील तरच लेकीला सासरी पाठवा…’
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस्विनीचा विवाह २५ जून २०२० रोजी गोरख सोनवणे याच्याशी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीला तिला चांगली वागणूक मिळाली. त्यांना ‘विरा’ (वय अडीच वर्षे) नावाची एक लहान मुलगी आहे. मात्र, मुलगी झाल्यानंतर सासरच्या मंडळींनी तेजस्विनीचा छळ करण्यास सुरुवात केली.
पती गोरख याने कार घेण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली. पैसे आणण्यास नकार दिल्याने तिला बेदम मारहाण आणि मानसिक त्रास देण्यात आला. जुलै २०२२ मध्ये पतीने तिला माहेरी आणून सोडले आणि “पैसे असतील तरच पाठवा, नाहीतर पाठवू नका” अशी तंबी दिली. त्यानंतर नातेवाईकांच्या मध्यस्थीने ती पुन्हा सासरी गेली होती.
डिलिव्हरीचा खर्च नाकारला, मुलासाठी अमानुष पवित्रा!
२८ नोव्हेंबर २०२३ रोजी तेजस्विनीला मुलगी झाली, तेव्हा सासरच्यांनी डिलिव्हरीचा खर्च देण्यास स्पष्ट नकार दिला. अखेर तिच्या वडिलांनी १ लाख रुपयांची रोकड आणून हॉस्पिटलचे बिल भरले. त्यानंतर जून २०२४ मध्ये तेजस्विनी पुन्हा गरोदर राहिली असता पती गोरख याने तिला माहेरी आणून सोडले. “हिला आधी मुलगी झाली आहे, तुम्ही आता मुलगा की मुलगी हे चेक करा आणि मुलगा असेल तरच आमच्याकडे आणून सोडा,” असा अमानुष पवित्रा पतीने घेतला. या प्रचंड मानसिक तणावामुळे तेजस्विनीचा स्वतःहून गर्भपात (अबॉर्शन) झाला.
फ्लॅटसाठी ३ लाख आणि सोन्याच्या अंगठीची मागणी; अधिक मासातील जेवणासाठीही घातली अट
एप्रिल २०२६ मध्ये पती गोरख याला फ्लॅट खरेदी करण्यासाठी ३ लाख रुपयांची गरज होती. त्याने तेजस्विनीकडे या पैशांची मागणी केली. तिने नकार दिला असता, तिला मारहाण करून माहेरच्या लोकांशी संपर्क तोडण्यास भाग पाडले गेले.मे २०२६ मध्ये ‘अधिक मास’ असल्याने तेजस्विनीच्या वडिलांनी जावई आणि व्याहींना जेवणासाठी बोलावले होते. मात्र, “आम्हाला सोन्याची अंगठी दिली तरच जेवायला येऊ, नाहीतर येणार नाही,” असा हट्ट गोरखने धरला. अखेर ते जेवायला आले, पण तेथेही रागाच्या भरात त्यांनी तेजस्विनीला मारहाण करत शिवीगाळ केली.
…आणि घात झाला!
२ जून २०२६ रोजी रात्री १० वाजता पती गोरख याने तेजस्विनीच्या वडिलांना फोन करून सांगितले की, “तेजस्विनीने आतून दरवाजा लावून घेतला असून ती दार उघडत नाही.” त्यानंतर काही वेळातच तेजस्विनीच्या मामांनी फोन करून सांगितले की, तेजस्विनीने गळफास लावून आत्महत्या केली आहे.तिला तातडीने पुण्यातील मनिपाल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. आपल्या मुलीला कार, फ्लॅट आणि सोन्याच्या अंगठीसाठी सासरच्यांनी शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याची कायदेशीर तक्रार तेजस्विनीच्या वडिलांनी दिली आहे. या फिर्यादीवरून चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.










