
‘तू शांत राहा, तुझी चिडचिडच तुझ्या त्रासाला कारण आहे’, असा प्रेमाचा सल्ला देणे एका ६५ वर्षीय काकांना चांगलेच महागात पडले आहे. पुतण्याने या सल्ल्याचा इतका राग धरला की, त्याने आपल्या सख्ख्या काकांचा झोपेत असताना कुऱ्हाडीने गळा चिरून निर्घृण हत्या केली. मुलेटीपदीकसा गावात ५ मे च्या मध्यरात्री ही खळबळजनक घटना घडली असून पोलिसांनी आरोपी पुतण्याला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पुनाराम बैसाकू धुर्वे (६५) असे मृत काकांचे नाव आहे, तर रामनाथ श्यामराव धुर्वे (२०) असे आरोपी पुतण्याचे नाव आहे. सुमारे चार महिन्यांपूर्वी रामनाथने आपल्या काकांना डोकेदुखीच्या त्रासावर एखादा चांगला वैद्य सुचवण्यास सांगितले होते. त्यावर काकांनी त्याला “स्वभावातील चिडचिड कमी कर आणि शांत राहा,” असा सल्ला दिला होता. हा सल्ला रामनाथच्या जिव्हारी लागला. त्यावरून दोघांमध्ये मोठा शाब्दिक वादही झाला होता. तेव्हापासून रामनाथ काकांचा प्रचंड राग मनात धरून होता आणि योग्य संधीची वाट पाहत होता.

शेतातील झोपडीत गाठले अन् काळ बनून आला…
५ मे रोजी रात्री पुनाराम हे नेहमीप्रमाणे गावाजवळील शेतातील झोपडीत झोपण्यासाठी गेले होते. ते गाढ झोपेत असल्याची खात्री पटताच, दबा धरून बसलेल्या रामनाथने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्याने धारदार कुऱ्हाडीने काकांच्या मानेवर सपासप वार केले. हा वार इतका भीषण होता की, पुनाराम यांचा जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला. हत्येनंतर रक्ताने माखलेली कुऱ्हाड घटनास्थळीच फेकून आरोपीने तिथून पळ काढला.
अवघ्या काही तासांत आरोपी अटकेत
६ मे रोजी सकाळी ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. कोरची पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान संशयाची सुई पुतण्या रामनाथकडे वळली. सहाय्यक निरीक्षक मुकुंद देशमुख आणि उपनिरीक्षक योगेश पवार यांच्या पथकाने शोध घेऊन दुपारी त्याला घरातूनच अटक केली.
पोलिस कारवाई
आरोपी रामनाथ धुर्वे याला ७ मे रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अवघ्या २४ तासांच्या आत आरोपीला अटक केल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. मात्र, एका साध्या सल्ल्यावरून रक्ताच्या नात्यानेच रक्ताचा पाट वाहिल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.










