रुपाली चाकणकरांच्या बहिणीचा ED समोर खळबळजनक गौप्यस्फोट

नाशिकच्या समता नागरी सहकारी पतसंस्थेतील मनी लाँडरिंग प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांची अंमलबजावणी संचालनालयाने तब्बल ८ तास कसून चौकशी केली. या चौकशीत प्रतिभा चाकणकर यांनी केलेले दावे आणि ईडीच्या हाती लागलेले तांत्रिक पुरावे यामुळे या प्रकरणातील गुंता वाढला आहे.

‘धार्मिक कामासाठी कागदपत्रे दिली अन् घात झाला’

चौकशीदरम्यान प्रतिभा चाकणकर यांनी खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, “धार्मिक कामासाठी आपण स्वतःचे आणि मुलाचे आधार-पॅन कार्डचे तपशील कॅप्टन अशोक खरातला दिले होते. मात्र, खरातने या कागदपत्रांचा गैरवापर करून बोगस खाती उघडली”. या खात्यांमध्ये नॉमिनी म्हणून खरातचे नाव असून, मोबाईल क्रमांकही त्याचाच वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप चाकणकर यांनी केला आहे.

तांत्रिक तपासाने चाकणकरांचा दावा खोडला?

प्रतिभा चाकणकर यांनी अशोक खरातशी संबंध नसल्याचा दावा केला असला तरी, ‘ईडी’च्या तांत्रिक तपासात मात्र धक्कादायक माहिती समोर आली आहे:
१ एप्रिल २०२५ ते १७ मार्च २०२६ या कालावधीत दोघांमध्ये तब्बल २३० पेक्षा जास्त कॉल्स झाले आहेत. कॉल व्यतिरिक्त २०० हून अधिक मेसेजेसची देवाणघेवाण झाल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.या प्रचंड संवादामुळे चाकणकर यांचा ‘संबंध नसल्याचा’ दावा संशयाच्या भोऱ्यात सापडला असून, ईडीकडून या संवादाची कसून पडताळणी सुरू आहे.

२६ लाखांचे झाले ४० लाख? ईडीचा संशय

ईडीच्या संशयानुसार, २०२१ मध्ये जमा झालेले सुमारे २६ लाख रुपये एका विशेष खात्यात वळवण्यात आले होते. ही रक्कम २०२४ पर्यंत तिथेच ठेवून त्यावर ४० लाख रुपयांचा परतावा मिळाल्याचा संशय आहे. नाशिकच्या समता पतसंस्थेत खरातने चालवलेल्या १३४ संशयित बोगस खात्यांमध्ये चाकणकर यांच्या नावावरील चार खात्यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.

मुलालाही समन्स; चौकशीचा फास अधिक घट्ट

या प्रकरणात केवळ प्रतिभा चाकणकरच नव्हे, तर त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर यालाही ईडीने समन्स बजावले आहे. ८ तासांच्या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर यांना सोडून देण्यात आले असले तरी, गरज पडल्यास त्यांना पुन्हा चौकशीला बोलावले जाण्याची शक्यता आहे.या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात आणि पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, अशोक खरात आणि चाकणकर यांचे नेमके कनेक्शन काय, हे आता लवकरच स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत.