पुण्याचा कुख्यात गुंड सचिन घायवळ राजस्थानमधून जेरबंद! बदलला होता चेहरा आणि राहणीमान

पुणे पोलिसांना गेल्या अनेक महिन्यांपासून हुलकावणी देणारा आणि कुख्यात घायवळ टोळीतील सक्रिय सदस्य सचिन घायवळ अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातून त्याला ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, पोलिसांच्या अटकेपासून वाचण्यासाठी सचिनने आपली ओळख, नाव, चेहरामोहरा आणि राहणीमान पूर्णपणे बदलले होते.

दाढी वाढवून सामान्य नागरिकासारखा वावर

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन घायवळ हा राजस्थानातील सिकर जिल्ह्यात नाव बदलून लपून राहत होता. त्याने दाढी वाढवली होती आणि वेगळा वेश परिधान केला होता. तो तिथल्या स्थानिक सामान्य नागरिकाप्रमाणे वावरत असल्याने पहिल्या नजरेत त्याला ओळखणेही पोलिसांना अवघड झाले होते. मात्र, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पुणे पोलिसांनी त्याचा अचूक माग काढला आणि त्याला बेड्या ठोकल्या.

महिला संचालिकेकडून ४४ लाखांची खंडणी उकळल्याचा आरोप

सचिन घायवळ हा कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ आहे. निलेशनंतर घायवळ टोळीत त्याचाच मोठा दबदबा मानला जातो. त्याच्यावर खंडणी, हत्येचा प्रयत्न, जीवे मारण्याची धमकी देणे यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. वारजे पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एका गुन्ह्यात, कर्वेनगर आणि शिवणे परिसरातील विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ व वाहतूक सेवा पुरवणाऱ्या एका खासगी कंपनीच्या महिला संचालिकेकडून तब्बल ४४ लाख ३६ हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप त्याच्यावर आहे.

ऊसाच्या शेतातून झाला होता पसार!

यापूर्वी पोलिसांनी सचिनच्या शोधासाठी पुणे जिल्हा, अहिल्यानगर (अहमदनगर) आणि मराठवाड्यात मोठी शोधमोहीम राबवली होती. काही महिन्यांपूर्वी तो जामखेड परिसरातील एका ऊसाच्या शेतातून पोलिसांना चकवा देऊन फिल्मी स्टाईलने पसार झाला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते.

शाळेतील ‘व्हॉलीबॉल कोच’ ते ‘कुख्यात गुंड’

सचिन घायवळच्या आयुष्याचा एक वेगळा पैलूही या निमित्ताने समोर आला आहे. तो यापूर्वी पुण्यातील कर्वेनगर परिसरातील एका नामांकित शाळेत व्हॉलीबॉल प्रशिक्षक म्हणून काम करत होता. मात्र, त्याच्या गुन्हेगारी कारवाया आणि पोलिसांत गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर शाळेने त्याची सेवा समाप्त केली होती.

घायवळ टोळीला मोठा धक्का; निलेश घायवळ अजूनही फरार

सचिन घायवळच्या अटकेमुळे पुणे आणि परिसरात दहशत पसरवणाऱ्या घायवळ टोळीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. दरम्यान, त्याचा भाऊ आणि टोळीचा म्होरक्या निलेश घायवळ हा अजूनही परदेशात फरार आहे. त्याचा पासपोर्ट आणि व्हिसा रद्द करण्यात आला असला तरी तो सध्या नेमका कोणत्या देशात लपून बसला आहे, याबाबत पोलिसांना ठोस माहिती मिळालेली नाही. पोलीस सध्या त्याचाही कसून शोध घेत आहेत.