
देशभरात सध्या सुरू असलेल्या इंधन तुटवड्याच्या भीषण परिस्थितीचे एक अत्यंत भयानक आणि मन सुन्न करणारे वास्तव हिंगोली जिल्ह्यातून समोर आले आहे. रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याचे कारण सांगून एका गरोदर महिलेला रुग्णवाहिका नाकारण्यात आली. तब्बल दोन तास रुग्णवाहिकेअभावी ताटकळत राहावे लागल्याने, वेळेत उपचार न मिळाल्यामुळे या माऊलीच्या पोटातच बाळाचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी आणि संतापजनक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र हळहळ आणि संताप व्यक्त केला जात आहे.

नेमके काय घडले?

हा धक्कादायक प्रकार हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार आरोग्य केंद्रात घडला. मनीषा इंगळे असे या दुर्दैवी गरोदर महिलेचे नाव आहे. मनीषा यांना प्रसूती कळा येऊ लागल्याने त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने ‘१०८’ या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून रुग्णवाहिका मागवली होती. मात्र, “अँब्युलन्समध्ये डिझेल नाही,” असे धक्कादायक उत्तर देत जवळा बाजार आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिका देण्यास नकार देण्यात आला.
दोन तासांची फरफट आणि निष्पाप जीवाने प्राण गमावला
शासकीय रुग्णवाहिका न मिळाल्याने अखेर नातेवाईकांनी स्वतः प्रयत्न करून एक खाजगी रुग्णवाहिका बोलावली. या सर्व गोंधळात आणि रुग्णवाहिका शोधण्यात गरोदर महिलेला तब्बल दोन तास शासकीय केंद्राबाहेर ताटकळत बसावे लागले.खाजगी गाडीने मनीषा यांना हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत प्रचंड उशीर झाला होता. वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने बाळाचा पोटातच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
शासकीय रुग्णालयाचा हात झटकण्याचा प्रयत्न; चौकशी समिती नियुक्त
या घटनेनंतर हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयाने सुरुवातीला आपली चूक लपवण्याचा प्रयत्न केला. “रुग्णवाहिकेत डिझेल होते, मात्र चालक उपलब्ध नव्हता,” असे भलतेच कारण पुढे करत प्रशासनाने हात झटकले. मात्र, माध्यमांनी हा प्रश्न लावून धरल्यानंतर आता प्रशासनाला जाग आली असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी ४ जणांची समिती नेमण्यात आली आहे.
राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया
राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली असून, “जर डिझेल उपलब्ध नसेल आणि यात आरोग्य अधिकारी दोषी आढळले, तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा इशारा दिला आहे.
देशातील इंधन तुटवड्याचे भीषण वास्तव!
अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात पेट्रोल आणि डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशाला इंधनाचा कमी वापर करण्याचे आवाहन केले होते. मात्र, इंधन तुटवड्याच्या भीतीमुळे आणि अफवांमुळे नागरिकांनी पेट्रोल पंपांवर कॅन आणि बाटल्या घेऊन मोठी झुंबड उडवली आहे, ज्यातून हाणामारीच्या घटनाही समोर आल्या आहेत. शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नसताना, आता थेट रुग्णवाहिकेलाही डिझेल मिळेनासे झाल्याने परिस्थिती किती गंभीर व चिंताजनक बनली आहे, हेच या हिंगोलीच्या घटनेवरून स्पष्ट होत आहे.










