
देशभर गाजलेल्या इंदौरच्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला आता एक अत्यंत वादग्रस्त वळण मिळाले आहे. गेल्या ११ महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या मुख्य आरोपी पत्नी सोनम रघुवंशी हिला मेघालय न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मात्र, हा जामीन पुराव्यांअभावी नाही, तर चक्क पोलिसांच्या एका तांत्रिक घोळामुळे मिळाला आहे. या निर्णयामुळे पीडितांच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला.

न्यायालयाने जामीन देताना पोलिसांच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले आहेत. सोनमच्या अटकेशी संबंधित सर्व कागदपत्रे,अटक मेमो, केस डायरी आणि अधिकारांची सूचना यामध्ये पोलिसांनी चक्क अस्तित्वात नसलेल्या कलम ४०३(१) चा उल्लेख केला होता. न्यायालयाने सांगितले की, भारतीय न्याय संहितेत असे कोणतेही कलम अस्तित्वातच नाही.

कोणत्याही आरोपीला आपण कोणत्या गुन्ह्याखाली अटकेत आहोत हे जाणून घेण्याचा अधिकार असतो. अस्तित्वात नसलेले कलम लावल्यामुळे आरोपीच्या अधिकारांचे हनन झाले असून, ही अटकच बेकायदेशीर ठरते, असे न्यायालयाने नमूद केले. सोनमला अटकेनंतर सुरुवातीच्या काळात कायदेशीर सल्ला किंवा वकील उपलब्ध करून दिल्याचे कोणतेही पुरावे रेकॉर्डवर नाहीत, असेही कोर्टाने निदर्शनास आणले.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे मृतक राजा रघुवंशीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांनी अत्यंत गंभीर आरोप करत आपला संताप व्यक्त केला. “माझा कायद्यावरचा विश्वास उडाला आहे. या प्रकरणात पैशांचा मोठा खेळ झाला आहे,” असा खळबळजनक आरोप राजाची आई उमा रघुवंशी यांनी केला.
आम्ही चित्रपटात ऐकायचो की कायदा आंधळा असतो, पण आज आम्हाला त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला, अशी भावना राजाचा भाऊ सचिनने व्यक्त केली.
दुसरा भाऊ विपिन रघुवंशी याने सांगितले की, पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे आरोपीला फायदा झाला आहे आणि या जामिनाविरुद्ध आम्ही तातडीने उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत.










