पार्थ, चुकलास! पक्ष कधीच संपत नसतो, पाय जमिनीवर असणं महत्त्वाचं

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद अजूनही राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहेत. त्यांच्या वक्तव्यानंतर आता शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यानंतर रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “तुम्ही सत्तेत असाल किंवा विरोधात, जमिनीवर राहणं महत्त्वाचं असतं.” त्यांनी पार्थ पवार यांच्या विधानावर सबुरीचा सल्ला देत म्हटले की, कोणताही पक्ष संपत नसतो आणि प्रत्येक पक्ष आपापल्या पातळीवर काम करत असतो. त्यामुळे दुसऱ्या पक्षाबद्दल बोलताना ‘तो संपला’ असे म्हणणे योग्य नाही.

ते पुढे म्हणाले की, पार्थ पवार यांचे वक्तव्य घाईगडबडीत झालेले वाटते. “आता त्यांना विचारलं तर कदाचित ते म्हणतील की, माझ्या विधानाचा वेगळा अर्थ काढला गेला. मात्र, ते विधान योग्य नव्हते,” अशा शब्दांत रोहित पवारांनी पार्थ पवारांचे कान टोचले.

तसेच या वादावर तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त करत रोहित पवार म्हणाले की, वरिष्ठ नेते, कुटुंबातील सदस्य काँग्रेसशी संवाद साधून काही मार्ग काढतील, अशी अपेक्षा आहे.